कंत्राटी कामगाराने केली आपल्या जागेवर दुसऱ्याची नियुक्ती


महानिर्मिती कंपनीला लावतोय लाखोचा चुना


संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेत


“त्या” तथाकथित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा-माजी जि.प.सदस्य सुनीता घेर


नागपूर : स्थानिक औष्णिक वीज केंद्रात एक कंत्राटी कामगार ठेकेदार बनला असून त्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून चक्क आपल्या जागेवर एका बदली कामगारांची नियुक्ती केली असून महानिर्मिती कंपनीला लाखोंचा चुना लावत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यासंदर्भात निष्पक्ष चौकाशी करून “त्या” तथाकथित कंत्राटदार व संबंधिक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी जि.प.सदस्य सुनीता घेर यांनी मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

खापरखेडा औष्णिक वीज केंद्र राख हाताळणी विभाग १ अंतर्गत मागच्या दीड-दोन वर्षापासून मे. त्रिमूर्ती इंजीनियरिंग सर्विसेस कंपनी कंत्राटी कामगार पुरवठादार म्हणून कार्यरत आहे. सदर कंपनीत सुधीर फेंडर नावाचा कंत्राटी कामगार कार्यरत असून त्याची नियुक्ती वारेगाव पंप हाऊस येथे आहे. मात्र, फेंडर याने वीज केंद्राचे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्याशी संगनमत करून आपल्या जागेवर एक नव्या अस्थाई बदली कामगाराची तटपुंज्या पगारावर मागील दीड दोन वर्षांपूर्वी नियुक्ती केली आहे.सुधीर फेंडर मागील दीड ते दोन वर्षांपासून कर्तव्यावर नाहीत याची कल्पना वारेगाव पंप हाऊस मध्ये कार्यरत कर्मचारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे, मात्र ते आर्थिक लाभापोटी “‘तेरी भि चूप मेरी भि चूप” च्या अवस्थेत आहेत.

खापरखेडा औष्णिक औष्णिक वीज केंद्र व वीज केंद्रा अंतर्गत येणारे विभाग प्रतिबंधित क्षेत्र आहे. प्रत्येकाला प्रवेशपत्र आवश्यक आहे याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना आहे. असे असतांना कर्तव्यावर असणाऱ्या कंत्राटी कामगारां ऐवजी दुसरा बदली अस्थायी कामगार नियुक्ती करण्याचा अधिकार दिला कुणी?
वारेगाव पंप हाऊसचे लॉकबुक बघितल्यास दुसराच कंत्राटी कामगार कार्यरत असल्याचे दिसून येते. मात्र, हजेरी पुस्तकेवर फेंडर यांचे नाव आहे त्यामूळे लॉकबुक व हजेरी पुस्तकेवर दोन वेगवेगळे नाव कसे काय असू शकतात? असा प्रश्न निर्माण झाला असून वीज केंद्रातील संबंधित अधिकारी आपले खिसे गरम करून मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप माजी जि.प.सदस्य सुनीता घेर यांनी केला आहे.

कंत्राटी कामगार सुधीर फेंडर यांचे माजी मंत्री व त्यांच्या एका स्थानिक राजकीय नेत्यांशी सुमधुर सबंध आहे. त्यामूळे वीज केंद्रातील अधिकाऱ्यावर दबाव तंत्र निर्माण करून (इन्क्वारी) कोटेशनची कामे घेऊन फेंडर यांनी ठेकेदारी सुरू केली आहे. शिवाय त्रिमूर्ती इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या कंपनीत पार्टनर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकाच वेळेस कंत्राटी कामगार व ठेकेदारी करून देयकांची उचल करून फेंडर महानिर्मितीची फसवणूक करीत असल्याचा आरोप सुनीता घेर यांनी केला आहे. सदर प्रकरणात वीज केंद्रातील बडे अधिकारी लिप्त असून उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत करून फेंडर व संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्य अभियंता राजू घुगे यांच्याकडे घेर यांनी केली आहे. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, प्रकाशगड कार्यालय, पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक यांना कळविण्यात आले आहे.


यासंदर्भात सुधीर फेंडर यांच्याशी संपर्क साधला असता मला काही बोलायचे नाही असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.


सदर प्रकरणा बाबत वीज केंद्रातील जन माहिती अधिकारी व उपमुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करून माहिती सांगणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *