भरत गवारी (जव्हार प्रतिनिधी)
खडखड पाणीपुरवठा योजनेमुळे जव्हारच्या रस्त्यांवर मातीचे ढिग
ठेकेदाराची मनमानी.नगरपरिषदेचे दुर्लक्ष,नागरिकांना मनस्ताप

पालघर : जव्हार नगर पालिकेकडून खडखड नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सदर कामाचा ठेका घुले या ठेकेदाराने घेतला आहे. मात्र सदर ठेकेदाराने काही नगरसेवकांशी अर्थपूर्ण व्यवहार करुन,नगराध्यक्षांना मॅनेज केल्यामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईनसाठी जेसीबीने खड्डे खोदले असून पाईप टाकल्यावर ते पूर्णपणे बुजवलेले नाहीत.अर्धवट बुजवलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहिलं तर सदर पाईप लाईनचे खोदकाम ब्रेकर च्या साहाय्याने करणे गरजेचे होते. मात्र वेळ वाचवण्यासाठी तसे केले गेले नाही.

विशेष म्हणजे जव्हार -नाशिक रस्त्यावर गोरवाडी नाक्याच्या पुढे व बायफ मित्रा कार्यालयाच्या अलीकडे वळणावर पाईपलाईनचे खोदकाम करून माती रस्त्यावर टाकल्याने मातीचा ढिगारा रस्त्यावर तयार झाला आहे. सदर रस्ता हा रहदारीचा असल्याने मातीच्या ढिगार्यामुळे दोन मोटार सायकलचे अपघात या ठिकाणी झाले आहेत.

आठवडाभरापासून हा मातीचा ढिग रस्त्यावर आहे. त्यामुळे मोठा अपघात घडून मनुष्यहानी होण्याची देखील शक्यता असल्याने सदर मातीचा ढिगारा तातडीने काढावा व शहरातील खड्डे गणेशोत्सवाच्या आधी भरण्याचे आदेश ठेकेदारास द्यावे असे निवेदन कोकण विभाग पत्रकार संघाच्यावतीने जव्हार नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले आहे.