दि.२९मार्च २०२४ रोजी मोखाडा आरोहन आणि एएससके फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा तालुक्यातील आशाताई व अंगणवाडी सेविका यांची अभ्यास सहल घडवून आणण्यात आली. आशा सेविका व अगंणवाडी सेविका यांना कर्करोगाबाबत पुरेशी माहिती व्हावी आणि त्यातून त्यांना जनजागृती करता यावी हा अभ्यास सहलीचा मुख्य उद्देश होता. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ‘डॉ. माने मेडिकल फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर’ यांच्याद्वारे संचालित ‘साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ याठिकाणी ही एकदिवसीय अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. या अभ्यास सहलीत एकुण २८ आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता.
मोखाडा आदिवासी बहुल भागात कर्करोगाबाबत अनेक संभ्रम,गैरसमज आणि भीती आहे. तसेच कर्करोगाचे विविध प्रकार, त्याची लक्षणे, कर्करोग होण्याची कारणे इत्यादींबाबत आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी राहुरी येथील साईधाम हॉस्पिटलमध्ये आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका, अभ्यासार्थी यांना नेण्यात आले. याठिकाणी डॉ. स्वप्नील माने (स्त्रीरोग तज्ज्ञ तथा लॉप्रोस्कोपिक सर्जन), डॉ. सायली कुलट (BHMS) आणि सामजिक कार्यकर्ते मनोज काजदरी आदी. मान्यवरांनी आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना कर्करोगाबाबत मार्गदर्शन व चर्चा केली. मोखाडा तालुक्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वाघ्याचीवाडी, सावरपाडा, हुंड्याचीवाडी, बादलपाडा, मारुतीचीवाडी, जोगलवाडी, राजेवाडी, बोरशेती आणि बोरिचीवाडी अशा नऊ पाड्यांवरील २८ आशा सेविका व अंगणवाडी सेविकांनी ह्या अभ्यास सहलीत उत्स्फुर्तपणे सहभाग घेत कर्करोगाबाबत जाणून घेतले.
यावेळी डॉ. सायली कुलट यांनी आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला. सुरूवातीला त्यांनी कर्करोगाला घाबरुन न जाण्याचे आव्हान केले. कर्करोगावर वेळेवर उपचार केल्यास तो पुर्णपणे बरा होऊ शकतो अशी त्यांनी माहिती दिली. तसेच कर्करोग होण्याची कारणे काय? कर्करोग झाला असल्यास त्याची लक्षणे कोणती? कर्करोगाच्या चार अवस्था कोणत्या? कर्करोगावरील उपचाराच्या तीन पद्धती जसे – शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी इत्यादी उपचार पद्धती त्यांनी समजावून सांगितल्या. त्याचप्रमाणे कर्करोगाचेही अनेक प्रकार आहेत जसे – तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, पचन संस्थेचा कर्करोग, जठराचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, मूत्रसंस्थेचा कर्करोग, थायरॉईड ग्रंथीचा कर्करोग अशा सर्व प्रकारच्या कर्करोगांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली माहिती दिली. यानंतर ‘डॉ. माने मेडिकल फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर’चे प्रमुख डॉ. स्वप्नील माने यांनीही आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना कर्करोगाबाबत सखोल मार्गदर्शन केले. कर्करोग हा जीवघेणा आजार असला तरी योग्य वेळेत उपचार केल्यास हा आजार पुर्णपणे बरा होतो. महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण हल्ली वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा पॅप टेस्ट (Pap Test) करवून घेणे आवश्यक आहे. ही पॅप चाचणी ‘साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ याठिकाणी मोफत केली जाते, त्याचे रिपोर्ट्सही दोन दिवसांत मिळतात. शिवाय ही चाचणी करताना रुग्णाला कोणताही त्रास होत नाही, त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. स्वप्निल माने यांनी केले.
आशा सेविका आणि अंगणवाडी ताई यांना या अभ्यास सहलीमुळे कर्करोगाबाबत सखोल माहिती मिळाली. “आम्हाला कॅन्सरबाबत फार थोडी माहिती होती, तसेच त्याच्या उपचारपद्धती, पॅप टेस्ट इत्यादी अनेक गोष्टी आम्ही पहिल्यांदाच ऐकल्या. या अभ्यास सहलीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली असून आता आम्हाला आमच्या कामासह वैयक्तिक आयुष्यातही त्याचा उपयोग होणार आहे. आजच्या अभ्यास सहलीसाठी आम्ही आरोहनचे आभार मानतो” अशा प्रतिक्रिया आशा सेविका व अंगणवाडी सेविकांनी दिल्या.
ह्या अभ्यास सहलीचे नियोजन करण्यात आरोहनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रदिप खैरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच प्रकल्प अधिकारी सौ.मीनाक्षी खिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अभ्यास सहल परिपूर्ण झाली. त्याचप्रमाणे आरोहनचे कार्यकर्ते प्रतिभा भोये,उत्तम गवते,मंगला गारे आणि अक्षय बैसाणे यांनी आपले मोलाचे योगदान दिले.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860