पालघर : (चिंचणी) – १९४२ साली भारताचा स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिासात आपल्या डहाणू तालुक्यातील चिंचणी गावाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. या आंदोलनात चिंचणी गावाच्या अनेक शुरविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्या स्वातंत्र्य संग्राममधील हुतात्म्यांच्या बलिदानाची गाथा…
डहाणू तालुक्याचे बंदरपट्टी व जंगल विभाग असे दोन भाग पडतात. रेल्वेच्या पूर्वेला असलेल्या जंगल विभागात आदिवासी लोक राहतात. स्वातंत्र्यपूर्वकाळात या भागातील आदिवासी जनता जमीनदार, ठेकेदार यांच्या भयानक पिळवणूक व दडपशाहीखाली पिचून गेलेली होती. बंदरपट्टीतील सर्वसाधारण जनता थोडीफार शिक्षित व आकलन करण्याची बौद्धिक पातळी असणारी अशी होती. त्या भागात सधन व सुशिक्षित मंडळी देखील होती. शिक्षणाच्या सोयीमुळे तरुण वर्गातही चैतन्य होते. म्हणूनच, डहाणू तालुक्यातील याच भागातील लोकांनी स्वातंत्र्य संग्रामात प्रामुख्याने भाग घेतला. चिंचणीला देखील देशभक्तीची आणि स्वातंत्र्य चळवळीची ज्योत लोकमान्य टिळकांच्या केसरीनेच पेटविली…
१९४२ साली झालेल्या चळवळीत या भागात प्रामुख्याने दोन प्रकारचे काम झाले. चिंचणीहून वीस स्वयंसेवकांनी सत्याग्रह करून निरनिराळ्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षा पत्कारल्या. त्यात सर्व समाजाचे लोक सामील झाले होते. ९ अॉगस्टला गांधीजींनी “चलेजाव” ची घोषणा केल्यानंतर या भागात चैतन्य संचरले. ११ अॉगस्ट, १९४२ ला तरुण स्वयंसेवकांनी गावातून मिरवणूक काढून सभा घेतली. सभेतील भाषणामुळे तरुण मुलांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला…
१४ अॉगस्ट रोजी दांडेपाडा येथे देखील एक प्रचंड सभा होऊन भाषणे करण्यात आली. सरकारी अधिकाऱ्यांपुढे मोठाच पेच निर्माण झाला. सभा संपल्यावर लोकांचा एक समुदाय समुद्रमार्गे के. डी. हायस्कूलच्या समोर आला. तेथे काही पोलीस होते. सभेतील भाषणांच्या परिणामामुळे पोलीसांना पाहताच त्यांनी पोलिसांच्या आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यातून संघर्ष सुरू झाला. एवढे निमित्त मिळताच पोलीसांनी जमावावर बेदरकारपणे अमानुष गोळीबार केला. त्यात श्री. चिंतामण लक्ष्मण बारी, श्री. रामकृष्ण वासुदेव करवीर, श्री. मंगळदास सुखलाल श्रॉफ, श्री. अहमदमिया इब्राहिम शेख व श्री. हरिभाऊ पवार यांना हौतात्म्य प्राप्त झाले. तसेच, श्री. नारायण वासुदेव सावे व काही जण जखमी झाले…
चिंचणीतील चळवळ आणि एकंदर वातावरण पाहून सरकारने चळवळ चिरडण्यासाठी एका क्रूर फौजदाराची नेमणूक केली होती. त्याने गावात दहशत बसविणेसाठी मिळेल त्याला झोडपण्यास सुरुवात केली. हत्यारी पोलीसांचा गावभर संचार सुरू केला. हे पाहताच गावातील तरुण स्वयंसेवक भूमिगत झाले. त्यांना शोधून काढण्याच्या निमित्ताने फौजदाराने अनेक नागरिकांना अमानुष मारहाण सुरू केली. तरी देखील श्री. छोटमकुमार भाणा, श्री. लक्ष्मण किणी, श्री. दिनकर सावे वगैरे अनेक चळवळ्या तरुणांना जनतेने निर्भयपणे आश्रय दिला. परंतु, श्री. भाणा ह्यास शोधून काढण्यात पोलीसांनी यश मिळविले. फौजदाराने त्याला अक्षरशः उचलून आदळले व अत्यंत क्रूरपणे त्यांना ठेचले व रक्तबंबाळ केले. परंतु श्री. भाणाने अखेरपर्यंत पोलीसांपुढे मान झुकविली नाही. ह्या संग्रामातील ही तरुण मंडळी या भागातील जनतेची आराध्य दैवते बनली याप्रमाणे डहाणू तालुका स्वातंत्र्य लढ्याचा जो संग्राम सुरू होता त्यावर चिंचणीला स्वयंसेवकांनी प्राणांची आहुती देऊन कळस चढविला. चिंचणीची ही भूमी हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झाली. ग्रामस्थांनी हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन करून के. डी. हायस्कूल येथे एक स्तंभ व पिंपळनाका येथे हुतात्मा स्मारक उभे केले आहे. तो नव्या पिढ्यांना स्वातंत्र्य संग्रामाचे व हुतात्म्यांचे सदैव स्मरण करून देतो आणि सांगतो….. अशा या तमाम हुतात्म्यांना कोटी कोटी वंदन….
माहिती संकलन: नगिन बारी