लातूर : लातूरकर नेहमीच चांगल्या माणसाचे व चांगल्या कामाचे कौतुक करतात. त्यामुळे लातूर जिल्ह्यात काम करताना अधिकारी व कर्मचार्यांना उत्साह येतो. यातून त्यांच्या हातून समाजाचे हित साधले जाते. एखाद्या अधिकार्याची बदली झाल्यानंतर लातूरकरांकडून त्याला निरोप नव्हे तर त्याने केलेल्या चांगल्या कामाचा सत्कार करण्यात येतो, असे प्रतिपादन लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी केले.
येथील जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे वर्ग – २ अधीक्षक राजेंद्र ढाकणे यांची पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयातील माध्यमिक विभागात अधीक्षक म्हणून बदली झाल्याबद्दल, वर्षा मनाळे यांची तहसीलदार पदी पदोन्नती झाल्याबद्दल व लातूर पंचायत समितीतील येथील अंकुश शिंगडे यांची लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात वर्ग – २ अधीक्षक पदी बदली झाल्याबद्दल या तिघांचा डॉ. मोरे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. नामदेवराव सोनवणे, राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे, सहाय्यक शिक्षण उपसंचालक ज्ञानेश्वर मोरे, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी प्रमोद पवार, वेतन पथकाचे अधीक्षक संजय क्षीरसागर व अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. मोरे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात काम करताना नेहमी ताण – तणाव येत असतो. त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या तब्येतीची काळजी घेवून या क्षेत्राला न्याय द्यावा. ढाकणे हे आपल्या सेवेबरोबरच तरुणांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करतात. ते आता शिक्षण संचालक कार्यालयात रुजू होत असल्याने राज्याला एक सक्षम अधिकारी मिळाला असल्याचेही डॉ. मोरे म्हणाले. सत्काराला उत्तर देताना ढाकणे यांनी लातुरातील नऊ वर्षांच्या सेवेतील कार्याचा आढावा सांगत लातूरकरांनी दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आभार मानले. यावेळी अन्य मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वरील तिघांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दयानंद कांबळे यांनी तर प्रास्ताविक संयोजक मदन धुमाळ यांनी केले. कार्यक्रमास संयोजक आदिनाथ मुसळे यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
{ अमोल गिरी प्रतिनिधी जिल्हा लातूर }