उमरगा प्रतिनिधी : सुरळीत व मुबलक विद्युत पुरवठ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांनी दि .२१ रोजी उमरगा येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता श्री शेंडेकर यांना सुकलेले झाड देत गांधीगीरी करत मुबलक विजेची मागणी केली . एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिठीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असताना वाढलेल्या उन्हाच्या कडाक्याने शेतीला पाण्याची प्रचंड आवश्यकता असताना महावितरण कंपनी मात्र आठवड्यातीत एकूण फक्त 24 तास शेतीसाठी वीज देत असून पाण्याअभावी हाता तोंडाशी आलेले पीक वाळून जात आहे . अशा परिस्थितीत महावितरण कंपनी शेतकऱ्यावर जाणीवपूर्वक विजपुरवठा न करता अन्याय करीत आहे . याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी उमरगा येथील महावितरणचे उप कार्यकारी अभियंता श्री शेंडेकर यांना वाढणाऱ्या पिकांचे प्रतीक म्हणून वाळलेले झाड देत मुबलक वीज पुरवठ्याची मागणी मागणी केली आहे . तसेच रामपूर येथे स्वतंत्र 33 केव्ही सबस्टेशन मंजूर करण्याची मागणी यावेळी केली . यासंबधाने बोलताना जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी , संबंध जिल्हाभर महावितरणची अशीच परिस्थिती असून भर उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी वीज न दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे . देण्यात येणारी वीज अत्यल्प असून आठवडाभरातील 168 तासांपैकी फक्त एकुण 24 तास वीज दिली जाते तीही रात्री दिल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी रात्र रात्र जागावे लागत आहे .अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांचे हाल करीत आहे . जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महावितरण ने मुबलक प्रमाणात व दिवसा विज न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन जिल्हाभर केले जाईल असा ईशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांनी दिला आहे . बलसुर रामपुर एजी फीडर सातत्याने ट्रीप होत असल्याणे दिवसा बलसुरला पाच तास व रामपूरला पाच तास वीज पुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांनी तात्काळ मान्य केले . यावेळी बलसुर चे अभियंता श्री.शिंदगी ,भाऊसाहेब बिरादार सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंदराव साळुंके, लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंके, माधव नागरे, प्रा . कवलजीत बिराजदार, पवन पाटील यांच्यासह तालुक्यातील ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते .