उमरगा प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि संशोधन व विकास कक्षाच्या वतीने गुरु अंगद देव अध्यापन,शिक्षण केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित आणि हरित रासायनिक प्रयोगशाळा‘ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये राज्य पातळीवरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन (दि.१८) करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. भास्कर लबडे, उद्घाटक डॉ. बालाजी मोरे आणि प्रमुख व्याख्याते डॉ. व्यंकट सूर्यवंशी हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. थोरे, डॉ. प्रवीण माने आणि डॉ. विनोद देवरकर यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी विविध रसायनांचे मूलभूत गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांचा सुरक्षित वापर करून जीवन सुसह्य केले पाहिजे असे मत डॉ बालाजी मोरे यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले तर या प्रयोगशाळेत विविध रसायने व रसायनशास्त्राच्या प्रयोगाची साहित्य आणि उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी, चुकून अपघात झालाच तर प्रथमोपचार,रसायनशास्त्राच्या अभ्यासक्रमात वेगवेगळ्या निसर्ग व पर्यावरण पूरक प्रयोगांचा समावेश कसा करता येतो आणि त्यांचे सादरीकरण डॉ. व्ही. एस.सूर्यवंशी यांनी केले. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात विविध रसायनाची उपयोगिता आणि सुरक्षित वापर करून आणि यामुळे ते निसर्ग व पर्यावरण पूरक कसे राहतील यावर डॉ. सूर्यवंशी यांनी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी गुरु अंगद देव अध्यापन आणि शिक्षण केंद्र नवी दिल्ली येथील संचालक व प्राचार्य, डॉ.जसविंदर सिंग आणि सहसंचालक प्रा. डॉ. विमल रार यांचे विशेष आभार मानले. प्रा. डॉ. भास्कर लबडे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यशाळेसाठी १०४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच डॉ. डी. व्ही. बोंदर, डॉ. बी. टी. व्हनाळे, डॉ. व्ही. एस. शिंदे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी यांनी केले तर डॉ एस. एम. सुरवसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.