तीसगावात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर
तीसगाव येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२२- २३ अंतर्गत ‘शाश्वत विकासाचे ध्येय’ या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गुरुवारी (२३ मार्च) करण्यात आले होते. या शिबिरात दौलताबाद, वडगाव कोल्हाटी, पंढरपूर जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, मुख्याध्यापक, आशा वर्कर, बचत गटाचे अध्यक्ष, संगणक परिचालक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत जलसुरक्षक, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले आहे.

पंचायत समितीच्या वतीने राबवलेल्या या प्रशिक्षण शिबिरासाठी गट विकास अधिकारी ओमप्रसाद रामावत यांच्यामार्फत पत्रक काढून नियोजन करण्यात आले आहे. या वेळी प्राचार्य पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खामगाव जिल्हा बुलढाणा या सेवाभावी संस्थेकडून दोन दिवस प्रशिक्षण दिले जाणार असून, चंद्रकांत सोनवणे, बिराजदार, संभाजी नागणे, क्रांतिपाल सिरसाठ यांनी शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पना सांगितल्या आहेत.

गरिबीमुक्त व रोजगारवृद्धीस पोषक, आरोग्यदायी, बालस्नेही, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित, सुशासनयुक्त, लिंग समभाव पोषक गाव याविषयी प्रशिक्षण देण्यात येत आहे. गावचा विकास कसा करावा, यासाठी आदर्श गाव पाटोदा येथील सरपंच जयश्री दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी तीसगावचे सरपंच शकुंतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे, ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड, करोडी सरपंच सुनिता गावंदे, ग्रामसेवक रमा कांबळे, पंढरपूरचे ग्रामविकास आधिकारी हरीश आंधळे, पाटोदा ग्रामविकास आधिकारी पी. एस. पाटील, उपसरपंच कपिंद्र पेरे, दौलताबादचे ग्रामविकास अधिकारी अख्तर चांद पटेल, निशा वाघ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, छत्रपती संभाजीनगर.
मो.8484818400