परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित प्राथमिक शाळा, पोफळी या शाळेतील इ. १ ली ते ४ थी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी तुम्हा सर्व बांधवांसाठी राख्या तयार केल्या आहेत. आपल्याला राख्या पाठवण्याचे हे चौथे वर्ष असून या राख्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नाजूक धाग्यांनी विणल्या गेल्या आहेत. या राख्या आपण येत्या ३० ऑगस्ट २०२३ रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या हातावर बांधून घ्याव्यात अशी आमच्या प्रशालेतील सर्व बालभगिनी, विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी यांची मनापासून इच्छा आहे. या राख्यांच्या बंधनातून सीमेवर रक्षण करणाच्या तुम्हा बांधवांना शत्रूशी लढण्याचे बळ आणि दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
जवान वीर हो, तुम्ही करत असलेले कार्य खरोखरच वंदनीय आणि प्रेरणादायी आहे. तुम्ही दिवसरात्र देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशरक्षणासाठी उभे असता त्यामुळेच आम्ही आमच्या घरी सुखाची झोप घेऊ शकतो आणि दैनंदिन जीवन व्यवहार सुरळीतपणे करू शकतो.गरुडाने आपल्या विशाल पंखाखाली आपल्या पिल्लांना घेतल्यावर त्या पिल्लांना सुरक्षित वाटते, त्यांना सभोवतालच्या जगाची अजिबात पर्वा नसते तसे तुमच्या संरक्षक पंखाखाली आम्हा भारतीयांना वाटत असते,
‘जो आपले संकटापासून रक्षण करतो. तो आपला भाऊ असतो’ असे आपली भारतीय संस्कृती सांगते. त्यातूनच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे सुरु झाली. भावाने आपल्या बहिणीचे सर्व संकटापासून रक्षण करावे म्हणून बहिण अत्यंत प्रेमाने तो रक्षा धागा म्हणजेच ‘राखी’ आपल्या भावाच्या हातावर बांधते किती सुंदर आणि पवित्र नाते असते ना हे ? ही भावना आणि त्या भावनेतून निर्माण होणारे प्रेम खरोखरच अतुट असते.
याच विश्वबंधुत्वाच्या नात्याने आमच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित प्राथमिक शाळा, पोफळीचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री. तुषारजी गोखले,सदस्य श्री.परागजी भावे,श्री. अभयजी चितळे,मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक-शिक्षक कार्यकारिणी सदस्य,ज्येष्ठ शिक्षिका सौ.शिवानी शिंदे,सौ.प्रतिभा धुमाळ,श्री.अशोक मिसाळ,सौ.साधना गायकवाड,सौ. मनिषा नाईक,सौ.अक्षता साळवी, श्रीम.सरिता मानकर,सौ.वारे, सौ.लाड तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते या नवोपक्रमांतर्गत राख्या पाठविण्यात आल्या.