अश्या होतकरू, कष्टकरी तरुणांना शासन सहाय्य करणार..?
धाराशिव :(सचिन बिद्री) श्री गणेश महोत्सवाच्या माठीमागे सामाजिक एकोपा,सामंजस्य हा एकमेव उदात्त हेतू टिळकांचा होता पण आजच्या काळात जिथे भयानक बेरोजगारीचा प्रश्न आजच्या सुशिक्षित युवकांना भेडसावत आहे तिथे एक रोजगाराची संधी निर्माण करून देणारा पर्व ठरत आहे. गेल्या 12 ते 14 वर्षांपासून टाकावू पासून टिकाउ असा उपक्रम आणि त्यातून रोजगार निर्माण करणारा अवलिया तरुण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील उमेश शेषेराव आबाचाने एक सुशिक्षित तरुण.
10 वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरविले, वडील हयात असताना पै पै जमा केलेल्या काही पैशातून लोकांच्या शेतातील चिंचेची झाडे खरेदी करणे, त्यातून मिळणाऱ्या चिंचा घरी घेऊन येणे घरातील पुर्ण सदस्यांना त्या चिंचा फोडायला लावून उत्पन्न निर्माण करणे असा काही हातावरचा पोट उमेश च्या वडिलांचा असायचा आणि त्यांच्यावरच पुर्ण कुटुंब (पत्नी, दोन मुले आणि तीन मुली)यांचा उदरनिर्वाह भागायचा. आपल्या वडिलांची काटकसर व दिवसरात्र धावपळ आणि कष्ट पाहून उमेशने पण घराच्या हालाखीच्या परिस्थितीला काही हातबार लावण्याची जिद्द बाळगली आणि टाकावू वस्तू पासून टिकावू हा संदेश शाळेत शिकलेला पाठ तो आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात आमलात आणत त्यातून काही उत्पन्न निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला.शालेय जीवनात उत्तम रंगरंगोटी, आणि कलाकुसरची आवड उमेश ला होती,त्यामुळे तो दरवर्षी गणेश आगमन होण्याधी शहरातील टीव्ही,फ्रिज विक्री करणाऱ्या दुकानाला भेटी देत टाकून दिलेले थर्माकोल जमा करायचा. त्या थर्माकोल ला एका विशिष्ट आकारात बारकाईने कापून, विविध रंगबेरंगी कलर काम करून उत्तम असे डेकोरेटिव्ह (मकर) तयार करू लागला त्याला बाजारात विकून मिळालेल्या पैशातून आई वडिलांना द्यायचा. आपल्या मुलाची ही तळमळ आणि जिद्द पाहून घरातीन सर्व सदस्य उमेश ला त्याच्या कामात सहकार्य करू लागले.
अचानक उमेशचे वडील शेषेराव यांच्या निधनानंतर उमेश वर मोठा भार पडला आणि जबाबदारी वाढली.पण उमेश डगमगला नाही.काही दिवस उपासमार झाली पण कोणाकडे हात पसरला नाही कारण त्याच्यात होता वडिलांचा स्वावलंबीपणा,प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान.!केवळ आपल्यातील कलेच्या बळावर उमेश कुटुंबाचा आधार बनला.पण उमेशकडे भांडवल काहीच न्हवते.त्यामुळे काही भांडवल प्राप्त करून व्यापार उभा करण्यासाठी त्याने बँकाना भेटी दिल्या तेंव्हा त्याला सांगण्यात आले की आधी काही बँक रेकॉर्ड,आर्थिक व्यवहार करा, इन्कमटॅक्स,पॅन कार्ड आदी कागदपत्रे तयार ठेवा तेंव्हा बँकेत कर्ज सुविधाचा विचार केला जाईल. बँकाच्या चकरा मारून थकलेला उमेश अखेर खाजगी सावकारांच्या संपर्कात आला काही रक्कम व्याजाने घेऊन पुण्याला गेला आणि तेथून कच्चा माल खरेदी करू लागला. दरम्यानच्या काळात त्याला त्याने तयार केलेल्या मकर ला पुण्यातून मागणी येऊ लागली तो पुण्याला माल पाठवू लागला. उमेश ने ₹200 ला पुण्याला विकलेला एक मकर पुण्यातील मोठ्या माँल मध्ये ₹1200/- ला अगदी सहज विकू लागले. पन मुळात उमेश अत्यल्प नफ्यावर मकर विकत असल्याने एका मकर मागे तो केवळ 10% ते 15% कमवू लागला तर दुसरीकडे त्याचा तयार माल घेऊन मोठ्या शहरांत अनेक पटीने विकून दलाल मोठे होऊ लागले तेंव्हा त्याला आपल्यातील कलेचा अधिक आत्मविश्वास निर्माण झाला.तो पुण्यातून कच्चा माल आणून आपल्या शहरातील बेरोजगार युवक युवतीना रोजगार देत वेगवेगळ्या स्वरूपाचे नवे-नवे डिझाईन तयार करू लागला आणि त्याचा व्यापार वाढू लागला. पन नेहमी प्रमाणे अधिक नफा न घेता कमीत कमी नफ्यात तो व्यवसायातून उदरनिर्वाह भागू लागला. उमेशच्या या व्यवसायामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार प्राप्त होऊ लागले हे सर्वात महत्वाचे ठरले आणी ठरत आहे.
आजच्या काळात जिथे अनेक तरुण राजकारणात वेगवेगळ्या पक्ष्यांच्या टोपी घालून हातात वेगवेगळे झेंडे हातात घेऊन नेत्यांची चापलुसी करत असताना दिसतात, गणपती उत्सव काळात केवळ डी जे च्या तालावर नाचून मद्यधुंद होऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे पैसे उधळत असतात, मोबाईल वर गेमिंग करत व सोशल मीडियावर टाइमपास तथा गप्पा मारत बसतात त्यांना उमेशचे हे उदाहरण बरंच काही शिकवनी देऊन जातं. वेळ कोणासाठी थांबत नसते तारुण्य अवस्थेत टाईम पास करत न राहता वेळेचा सदुपयोग कसं करता येईल याचा नक्की विचार करावा, आपल्या आयुष्यात ध्येय ठरवून ध्येय साध्य करण्यासाठी धरपड करणारा उशिरा का होईना यशस्वी होतोच.
एकदिवस उमेश नक्की एक मोठा व्यापारी (उद्योजक)बनेल,बँक सहाय्य नक्की लाभेल आणि शासन प्रशासन अश्या होतकरू कष्टकरी युवकांना रोजगार निर्मिती तथा वृद्धी करिता पुढाकार घेईल हिच अपेक्षा.