सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.10, महाराजस्व अभियान 2023 अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील जवळपास दोन हजार पात्र लाभार्थ्यांना राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.
शासकीय योजनेसह शिधा पत्रिकेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा असे निर्देश यावेळी मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. नव्याने वितरित करण्यात आलेल्या शिधा पत्रिका धारकांना पुढील महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवठा करण्यात येणार असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.
महाराजस्व अभियान 2023 अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील जवळपास 2 हजार पात्र लाभार्थ्यांना ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शिधा पत्रिकेचे वाटप करण्यात आले. शहरातील तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ना. अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी तहसीलदार रमेश जसवंत, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा.गाढे, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, डॉ. मच्छिद्र पाखरे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, मेघा शाह, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, दामूअण्णा गव्हाणे, राजूबाबा काळे, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, अजीजसेट बागवान, सतीश ताठे, विशाल जाधव, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, पुरवठा नायब तहसीलदार कमल मनोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की, शासन गरीबांसाठी अनेक योजना राबवते , अशा योजना पात्र लाभार्थ्यांना मिळणे गरजेचे असून यासाठी गावांतील सरपंच, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महसूल, ग्रामविकास, कृषी यासह सर्व शासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे काम करावे. पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे देखील ना. अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे परंतू त्याची ऑनलाईन नोंदणी न झाल्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही. त्यासाठी ते कार्ड ऑनलाईन करून घेण्याची जबाबदारी पुरवठा विभागाने घ्यावी जेणेकरून रेशन मिळण्याबाबत ज्या तक्रारी आहेत त्या संपतील आणि शेवटच्या घटकापर्यंत शासनाची योजना पोहोचविता येईल, असेही शेवटी ना. अब्दुल सत्तार यांनी नमूद केले.
शासकीय योजनांचा लाभ हा मोफत दिल्या जात आहे. याव्यतिरिक्त जर कोणी दलाल पैसे घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा गंभीर इशारा ना. अब्दुल सत्तार यांनी दिला.
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा यासाठी संचिका व नोंदणीसाठी लाभार्थ्यांना लागणारा खर्च हा मित्र मंडळाच्या वतीने भरण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ पूर्ण पणे मोफत असून लाभार्थ्यांनी यासाठी कुणालाही पैसे देऊ नये असे अवाहन ना. अब्दुल सत्तार केले आहे.
या कार्यक्रमात दोन हजार लाभार्थ्यांना शिधा पत्रिकेचे वितरण करण्यात आले. सोबतच आयुष्यमान कार्ड ई केवायसी, नवीन मतदार नोंदणी, नवीन रेशनकार्ड नोंदणी अशा विविध योजनेसाठी लाभार्थ्यांनी नोंदणी केल्या.