चिपळूण: परशूराम एज्यूकेशन सोसायटीचे मो. आ. आगवेकर माध्यमिक विद्यालय व सी. ए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलारे, ता. चिपळूण या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी चि. हर्ष विलास मोहिते याला २०२३-२४ वर्षाचा चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर झाला आहे. हर्ष हा एक अभ्यासू मुलगा आहे. अभ्यासासोबत अवांतर वाचन, सामान्य ज्ञान, तंत्रज्ञान याची त्याला विशेष आवड आहे. तो यासाठी नियमित परिश्रम घेत असतो. हर्ष चे वडील श्री. विलास कृष्णा मोहिते व आई सौ. वैष्णवी विलास मोहिते त्याच्या तयारीसाठी नियमितपणे विशेष प्रयत्न करीत असतात. नुकत्याच झालेल्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड फेरीच्या मुलाखतीमध्ये हर्षने मुलाखतीतील सर्वच प्रश्नांना उत्तम प्रतिसाद दिला होता. त्याची उल्लेखनीय कामगिरी आणि त्याने मिळवलेल्या सर्वच स्तरांतील स्पर्धा परीक्षांमधील यश व आत्मविश्वास याच्या जोरावर त्याला या वर्षाचा चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते श्री. मोहन जोशी यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये १०००/- रुपये, ५०० किमतीची पुस्तके, सन्मानचिन्ह व कौतुक पत्र असे आहे. हर्षच्या या यशाबद्दल परिसरातील सर्वच स्तरातून त्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. अलोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वाचासिद्ध सर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी हर्षचे विशेष कौतुक केले आहे.