पालकांचा शाळेतील उत्स्फूर्त सहभाग या अंतर्गत पएसो.संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथे गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी एक दिवस पालकांचा हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. प्रेमराज परळीकर यांच्या हस्ते भगवान श्री परशुरामांच्या पूजनाने करण्यात आली.उपस्थित सर्व पालक-शिक्षकांचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर संपूर्ण परिपाठ उत्तम प्रकारे पालकांनीच सादर केला. यामध्ये प्रार्थना,श्लोक,सुविचार,दिनविशेष,बोधकथा यांचा समावेश होता.आज इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व वर्गांना शिक्षक म्हणून काम करणाऱ्या पालकांनीच मराठी,गणित तसेच इंग्रजी या विषयांचे छान अध्यापन केले.विद्यार्थ्यांना खूप मजा आली तसेच पालकांनाही शिक्षक होण्याचा नवीनच अनुभव घेण्याची संधी मिळाली.यानंतर शाळेच्या मैदानावर पालक,विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम मुलांनी आपल्या पालकांना नमस्कार केला.त्यानंतर भोजन मंत्र म्हणून मुलांनी पालकांना व पालकांनी मुलांना घास भरवला.सहभोजनाच्या निमित्ताने पालक-शिक्षक कार्यकारिणीचे उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.वैभवजी पवार यांच्या मार्फत सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक यांना जिलेबी वाटप करण्यात आली.पालकांसाठी संगीत खुर्ची व ज्ञानकुंभ असे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.ज्ञान कुंभाच्या माध्यमातून पालकांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या .महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.उपस्थित महिला पालकांना शाळेकडून हळदी कुंकू तसेच वाण देण्यात आले.संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्यांना प्रशालेतर्फे बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्य श्री.अभयजी चितळे साहेब आवर्जून उपस्थित होते.त्यांनी सर्वांबरोबर सहभोजनाचा आनंद घेतला.शाळेने राबवलेला हा एक दिवस पालकांचा या अनोख्या उपक्रमाचे सर्वच पालकांनी कौतुक व समाधान व्यक्त केले.मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका सौ.शिवानी शिंदे सौ.प्रतिभा धुमाळ, श्री.अशोक मिसाळ,सौ.साधना गायकवाड, सौ.मनिषा नाईक,सौ.अक्षता साळवी,श्रीमती मानकर, सौ.लाड यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सहकार्य केले.