परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात रथसप्तमी तसेच जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथी योग शिक्षिका तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ.मुग्धाताई देशपांडे यांच्या हस्ते सूर्यदेव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात शिशूविहार,प्राथमिक व माध्यमिक च्या सर्वच विद्यार्थ्यांचा सहभाग होता.कार्यक्रमासाठी क्रीडा भारतीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. निशाताई आंबेकर यादेखील उपस्थित होत्या.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सौ मुग्धाताई देशपांडे यांनी विद्यार्थ्यांकडून प्राणायाम तसेच योगासनाचे प्रात्यक्षिक करून घेतले.माध्यमिक विभागाचे क्रीडाशिक्षक श्री.प्रदीपकुमार यादव सर यांनी विद्यार्थ्यांकडून पूरक हालचाली करून घेतल्या तर प्राथमिक विभागाचे शिक्षक श्री.अशोक मिसाळ सर यांनी मंत्रासहित सूर्यनमस्कार घालून घेतले. सौ.मुग्धाताई देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक तास तरी खेळले पाहिजे तसेच सकस आहार घेतला पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.शरद सोळुंके सर ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी सर शिशुविहार विभाग प्रमुख सौ.सुप्रिया वारे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना खजूर व राजगिरा लाडू देण्यात आला. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.