जालना लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभेचा रणसंग्रामात रावसाहेब दानवेंचा प्रतिस्पर्धी कोण, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, जालन्यात ‘मराठा’ फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.
जालना लोकसभा : मनोज जरांगे पाटलांचा निवडणुकीवर परिणाम होणार? रावसाहेब दानवेंच्या विजयात मराठा फॅक्टर महत्त्वाचा
जालना लोकसभा निवणुक 2024
NEXTPREV
लोकसभा निवडणूक 2024 : एकीकडे मोसंबीचा आगार, स्टील उद्योगाचं केंद्र तर दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्र ओळख असलेल्या जालन्याची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे रावसाहेब दानवे. जालना लोकसभा मतदार संघ भाजपचा गड पर्यायाने रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला मानला जातो. 1999 पासून या मतदारसंघावर दानवे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. 2009 चा अपवाद वगळता दानवेंचं मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व आहे. भाजपच्या अनुभवी आणि 35 वर्ष राजकरणात सक्रिय असलेल्या दानवेंच्या या गडात प्रतिस्पर्धी उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही.
जालना लोकसभा निवडणुकीत ‘मराठा’ फॅक्टर महत्वाचा
जालना लोकसभा मतदारसंघात यावेळेस परंपरागत भाजप आणि काँग्रेसमध्ये लढतीची शक्यता जरी असली तरी याच मतदार संघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने देखील दावा करण्यात आला आहे. शिवाय राज्यात मराठा आरक्षणाची ठिणगी पडली, त्या जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचा लोकसभेच्या निवडणुकीवर प्रभाव असल्याने मतदारसंघात यावेळी निवडणुकीची झुंझार खेळी होऊ शकते.
रावसाहेब दानवेंचा प्रतिस्पर्धी कोण?
राज्यातील महत्त्वाचे नेते असलेल्या मतदारसंघांपैकी जालना लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे, राज्यातील मोसंबीचा आगार तसेच, स्टील उद्योगाचा केंद्र म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणून सुद्धा या भागाची ओळख आहे, त्यामुळे इथले काही प्रमुख प्रश्न आणि समस्या आहेत, ज्याचा या निवडणुकीच्या रणसंग्रामात वाटा असणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलं, त्यांच्या निमित्ताने काही प्रश्न सुटले तर काही बाकी आहेत, दुसरीकडे राजकीय द्वंद्वात लोकसभेचा हा संग्राम कसा होऊ शकतो याचा आढावा या लेखातून घेऊ.
देशात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता जाहीर झाली आहे. राज्यातील अन्य मतदारसंघात उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. जालन्यात मात्र भाजपचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांचं नाव जाहीर झाले असले तरी दानवेंना शह देण्यासाठी महविकास आघाडीकडून एकही नाव पुढे आलं नाही. त्यामुळे सलग पाच वेळा निवडून आलेले दानवे सहाव्यांदा दिल्लीवारी करतील की नाही, हे बघावं लागेल.
जालना लोकसभेची रचना
जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री ,पैठण या एकूण सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.
मतदारसंघाचा इतिहास
एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा बाळासाहेब पवार, अंकुशराव टोपे यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसच्या वतीने या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केला आहे. 1991 साली अंकुशराव टोपे यांनी काँग्रेसकडून ही जागा लढवत विजय मिळवला होता, हा काँग्रेसचा आजपर्यत चा शेवटचा विजय. 1996 पासून ही जागा भाजपसाठी नेहमीच अनुकूल राहिली गेली. 7 टर्म या मतदारसंघावरती भाजपचाच वर्चस्व आहे,यातील 5 टर्म सातत्याने रावसाहेब दानवे यांचाच विजय झालाय.
1996 आणि 1998 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तमसिंग पवार हे भाजपतर्फे निवडून आले होते. 1999 मध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करीत रावसाहेब दानवे हे प्रथमच खासदार म्हणून निवडून गेले.त्यानंतर सलग पाच वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 1999मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
2009 मध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध चांगली लढत दिली होती या लढतीत डॉक्टर कल्याण काळे यांचा 8 हजार 482 मतांनी पराभव झाला होता. 2014 साली मोदी लाटेत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा 2 लाख 6 हजार 798 मतांनी पराभव केला होता.
सध्या ‘या’ मतदारसंघात कोणाची किती ताकद?
जालना : कैलास गोरंट्याल, काँग्रेस
भोकरदन : संतोष दानवे, भाजपा
बदनापूर : नारायण कुचे, भाजपा
सिल्लोड : अब्दुल सत्तार, शिवसेना शिंदे गट
पैठण : संदीपान भुंबरे, शिवसेना शिंदे गट
फुलंब्री : हरिभाऊ बागडे, भाजप
2019 निवडणुकीचा निकाल
मागील निवडणुकीत रावसाहेब दानवे 3 लाख 32 हजार 815 मतांनी विजयी झाले होते.
1) रावसाहेब दानवे,भाजपा – 698019
2) विलास अवताडे, काँगेस – 365204
3) डॉ.शरदचंद्र वानखेडे, वंचित – 77158
महविकास आघाडीत जागा कोणाला? कोणकोणते उमेदवार इच्छुक?
भाजपमधून रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी जाहीर झाली असली तरी, महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवार आणखी ठरलेला नाही. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे, अर्थात तुल्यबळ उमेदवाराच्या प्रतीक्षेत असलेल्या आघाडीमध्ये काँग्रेसच्या परंपरागत दाव्यानुसार काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर आहे, या मतदारसंघात काँग्रेसकडून ओबीसी नेते म्हणून सत्संग मुंढे यांचं नाव देखील इच्छुकांमध्ये आहे.
दरम्यान, सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसकडून ही जागा उद्धव ठाकरे गटाला मिळावी यासाठी जिल्ह्यातील स्थानिक शिवसेना नेते आग्रही आहेत, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्याची मागणी केली होती. ते देखील रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी या निवडणुकीमध्ये सज्ज आहेत, याशिवाय नुकताच काँग्रेसमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे डॉ. संजय लाखे पाटील हे देखील उबाठा गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सध्यातरी यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत (ठाकरे) उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.
या मतदारसंघात जातीय समीकरणे काय आहेत?
एकूण मतदान – 1938621
स्त्री मतदार – 916319
पुरुष मतदार – 1018251
तृतीयपंथी मतदार – 51
जातीय समीकरणं
मराठा – 367460 – 19%
मुस्लिम – 348120 – 18%
ओबीसी – 580200 – 30%
बौद्ध – 328780 – 17%
इतर – 309440 – 16%
मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव
मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या जालन्यातूनच रावसाहेब दानवे आणि कोणाची फाईट होतीय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचंबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या पूर्ण न केल्यामुळे मराठा समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय,जिल्ह्यात जरांगे यांना मिळालेला पाठिंबा पाहता, समाजातील सरकारविरोधात वातावरण निवडणुकीच्या मतदानात परावर्तित झाल्यास याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी या विषयी कोणती जाहीर भूमिका घेतली जरी नसली, तरी मधल्या काळात भाजपमधील वरिष्ठ नेते आणि त्यांनी जरांगे यांच्यावर केलेले आरोप पाहता, स्थानिक पातळीवर मनोज जरांगे पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात अप्रत्यक्ष पणे टीका टिपण्णी झाली. शिवाय जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाकडून निवडणुकीत अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.साहजिकच याचा तोटा अधिक प्रमाणात सत्ताधारी पक्षाला पर्यायाने दानवेंना होऊ शकतो.
एकंदरीतच काय तर इतिहास पाहिला तर रावसाहेबांचा विजय हा सोप्पा दिसत असला तरीही मनोज जरांगे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या लोकसभा निवडणूक दानवेंना जड जाईल यात काही शंका नाही.
बदनापुर – जालना प्रतिनिधि
किशोर सिरसाठ
9765686339