वाशिम:-ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे खऱ्या अर्थाने गावाचे सेवक असुन त्यांनी गावाचा विकासात्मक कायापालट करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले. दिनांक 28 रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक आस्थापना लिपिक, विस्तार अधिकारी (पं.) व सर्व गट विकास अधिकारी यांची सभा घेऊन गावांचा विकासात्मक कायापालट करण्याकरिता 11 कलमी कार्यक्रम दिला.
बैठकीत सीईओ वाघमारे यांनी गावाच्या विकासामध्ये ग्रामसेवकांची भूमिका किती महत्वाची आहे याची जाणीव करुन दिली. आवास योजना, पंचायत विकास निर्देशांक अशा बऱ्याचशा मानकांमध्ये ग्रामसेवकांनी चांगले काम केल्याची दखल घेत त्यांचे कौतुकही केले. सभेला पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
गावाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक ग्रामसेवकांनी 11 कलमी कार्यक्रमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश सीईओ वाघमारे यांनी दिले. इथून पुढे आपला गोपनीय अहवाल लिहिताना त्याचे गुणांकन याच मुद्द्याच्या अनुषंगाने होईल असे सांगुन नोकरी प्रिय असेल तर प्रामाणिकपणे काम करा, कामात कुचराई आणि दिरंगाई कदापि खपवुन घेतली जाणार नसल्याचा गर्भीत ईशारा सीईओ वाघमारे यांनी दिला.
ग्राम विकासाकरिता 11 कलमी कार्यक्रम:
1) ग्रामसेवकांच्या उपस्थितीबाबत वेळापत्रक:
प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अ) दर्शनी भागावर, ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस b)स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने, ब) सहजासहजी निघणार नाही असे, क) जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या आकारातील वेळापत्रक चीटकवणे अथवा लावणे.
2) वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करणे:
अ) यामध्ये बरोबर सकाळी 9:45 मिनिटांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहणे.
ब) सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी पहिल्या सत्रामध्ये कार्यालयात उपस्थित राहून कार्यालयीन कामकाज पाहणे.
क) मंगळवार व गुरुवार या दिवशी पंचायत समिती स्तरावरील तसेच जिल्हा परिषद स्तरावरील कामकाज पार पाडणे.
ड) मंगळवार व गुरुवार या दिवशी पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेमध्ये मीटिंग अथवा कामकाज नसल्यास आपल्या ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहणे.
इ) ज्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे त्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये कार्यालयामध्ये उपस्थित राहून कामकाज पाहणे व दुपारनंतरच्या सत्रांमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्रभेटी करून लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडवणे. त्यामध्ये गावातील सर्व गटारे स्वच्छ करून घेणे, गावातील दिवाबत्ती व्यवस्थित करून घेणे, गावातील पात्र घरकुल लाभार्थी सुटले नाहीत याची खात्री करणे, अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याकरिता सनियंत्रण करणे, सर्वांचे नमुना आठ दिले गेले आहेत याबाबत खात्री करणे, कोणाची ही जन्म मृत्यू नोंद सुटली नाही याची खात्री करणे, कोणाचीही विवाह नोंदणी सुटलेली नाही याबाबत खात्री करणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव होतो.
ई) आपण कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्रभेटी व्यवस्थित करता की नाही हे खालील दोन बाबीवरून तपासले जाईल. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये आपणास 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास गावातील बहुसंख्य लोक आपणास ओळखत असले पाहिजेत. त्याच सोबत सीईओ किंवा बीडिओ जेव्हा आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्राला अचानक भेट देतील तेव्हा उपस्थित लोकांपैकी बहुसंख्य लोक आपणास ‘ग्रामसेवक’ म्हणून ओळखत असले पाहिजेत.
फ) मंगळवारी आणि गुरुवारी आपण कोठे असणार आहे. व आपले त्या दिवसभराचे काय नियोजन आहे याबाबत जिल्हास्तराच्या ग्रुप वर सकाळी 9:45 वाचण्यापूर्वी दिवसभराच्या कामकाजाचे काय नियोजन आहे याबाबत माहिती असलेला मेसेज सादर करणे.
ज) अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेळापत्रकाच्या नुसार जर आपणास आवश्यक ठिकाणी उपस्थित राहता येणार नसेल तर वेळेच्या आधी जिल्हास्तरावरच्या ग्रुप वर मेसेज टाकून आपण कोठे आहात किंवा कोणते काम करत आहात याबाबत जिल्हास्तरावरच्या कार्यालयीन ग्रुप वर पूर्वसूचना देऊन ठेवणे. (सकाळी 9:45 वाजन्यापूर्वी अथवा कोणत्याही अचानक कामानिमित्त मुख्यालय सोडावयाचे असल्यास मुख्यालय सोडण्याच्या किमान पाच मिनिटाआधी.)
3) व्यवस्थित ग्रामसभा घेणे:
a) ग्रामसभेबाबतची दवंडी देऊन त्याचा व्हिडिओ बनवून जिल्हास्तरावरच्या ग्रुप वर शेअर करणे.
b) किमान शंभर प्रौढ व्यक्ती अथवा प्रौढ मतदारांच्या 15 टक्के यापैकी जे जास्त असेल ते यांचा कोरम पूर्ण झाल्याशिवाय ग्रामसभा न घेणे.
c) ग्रामसभेचा फोटो व्यवस्थित अँगलमधून घेऊन जिल्हास्तरावरच्या ग्रुप वर शेअर करणे. सदर फोटो अशा पद्धतीने घेतला जावा जेणेकरून त्या फोटोमध्ये किती व्यक्ती उपस्थित होते हे मोजता येईल. सदर फोटो हा टाइम स्टॅम्प आणि जिओ टॅग असावा. त्यामध्ये गावाचे नाव, तारीख, वेळ लाँजीट्यूड व लॅटिट्युड येत असावे.
d) ग्रामसभेला जर पुरेशे नागरिक उपस्थित होत नसतील तर ग्रामसेवक यांनी ग्रामसभेच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यामध्ये हालगर्जीपणा केलेला आहे असे गृहीत धरण्यात येईल.
4) ग्रामपंचायत कार्यालय जिवंत करणे:
a) बऱ्याच वेळा ग्रामपंचायत कार्यालय ही ओसाड पडल्यासारखी असतात. ग्रामपंचायत कार्यालय जिवंत करणे म्हणजे समस्या सोडविणारी ग्राम पंचायत निर्माण करणे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सीईओ कार्यालय येथे जशी नागरिकांची वर्दळ व लगबग असते तशा पद्धतीची वर्दळ व लगबग ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये निर्माण होईल याबाबत उपाययोजना करणे. असे केल्याने ग्राम स्तरावरच्या समस्या गावपातरीवरच सोडवल्या जातील व ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद स्तरावर नागरिकांना अनावश्यक पणे करावे लागणारे हेलपाटे थांबले जातील.
b) ग्रामपंचायत कार्यालय जिवंत करणे म्हणजे, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी किमान 30-40 नागरिकांच्या समस्या कार्यालयात सोडवणे.
c) ग्रामपंचायत कार्यालय जिवंत करणे म्हणजे ग्रामपंचायतचा सर्व स्टाफ कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून कामकाज पार पाडणे.
d) ग्रामपंचायत कार्यालय जिवंत करणे म्हणजे, शासनाची विकास काम करणारी यंत्रणा गावामध्ये कार्यरत आहे, म्हणजेच सरकार गावांमध्ये आहे याची जाणीव गावातल्या बहुसंख्य नागरिकांमध्ये निर्माण होईल, अशा पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज चालवणे.
e) ग्रामपंचायत कार्यालय जिवंत करणे म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाकडून नागरिकांना ज्या सेवा सुविधा देय आहेत त्या स्वयंस्फूर्तीने स्वतः होऊन नागरिकांना उपलब्ध करून देणे.( यामध्ये स्वच्छता असेल, नमुना आठ उपलब्ध करून देणे असेल अथवा विविध दाखले उपलब्ध करून देण्याची सेवा असेल.)
5) 100% कर वसुली:
a) वर्षभरामध्ये शंभर टक्के घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्याबाबत नियोजन करणे.
b) कर वसुलीच्या उद्दिष्टांचे 12 तुकड्यांमध्ये विभाजन करून दर महिन्याचे उद्दिष्ट तयार करणे व प्रत्येक महिन्याला ते उद्दिष्ट पूर्ण करणे.
c) मोहीम काढून कर गोळा करणे. ग्राम पंचायत स्तरावरील वीज देयके व ईतर किरकोळ देयके प्रलंबित नसावी.
d) कर भरताना, नागरिक ‘आम्हाला काय सेवा भेटतात’ याबाबत विचारणा करतील. त्यामुळे त्यांना स्वयंस्फूर्तीने सर्व सेवांचा त्यापूर्वीच लाभ देणे जेणेकरून कर भरण्याकरिता नागरिकांना समाधान वाटेल.
6) पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन:
घरकुले तथा विहिरी मंजूर करून घेण्याकरिता प्रति लाभार्थी वीस हजार रुपये मागणी केल्याच्या बऱ्याचशा तक्रारी कार्यालयास प्राप्त होतात. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही सेवा देताना 25 पैशाचीही अतिरिक्त मागणी केल्याची जरी तक्रार आली तरी सदर बाब गंभीरपणे घेतली जाईल व कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. त्यामुळे जोपर्यंत विद्यमान सीईओ जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत त्या काळापर्यंत वरकमाईच्या बाबतीत पूर्णपणे कडकडीत उपवास पाळला जावा याची सर्व कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे खबरदारी घेणे.
7) नियमांना आणि लोकहिताला धरून काम करणे:
A) कोणतेही काम करताना नियमांना बगल दिली जाऊ नये.
B) शासनाचे प्रत्येक काम करताना लोकहित लक्षात ठेवून काम करावे. नियमांना बगल दिल्याची बाब समोर आल्यास संबंधितावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
8) स्वयंप्रेरणेंनी नागरिकांना सेवा देणे:
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सेवा सुविधा देण्याकरिता नागरिकांनी अर्ज करण्याची किंवा मागणी करण्याची वाट न पाहता मूलभूत सुविधा नागरिकांना स्वतः पुरवणे.
अ) यामध्ये स्वतःहून सर्वांचे नमुना आठ देणे
ब) क्षेत्रभेटी करून गावांमध्ये स्वच्छता असल्याची खात्री करणे.
क) गावामधील सर्व व्यक्तींची जन्म आणि मृत्यू नोंद तसेच विवाह नोंद झाल्याबाबत वेळोवेळी खात्री करणे आणि तशी प्रमाणपत्रे त्यांना देणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव होतो.
9) गावातील शासकीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवणे:
गावातील जि. प. प्रशासनाची ग्राम विकासासंबंधीची कार्यालये व्यवस्थितपणे कामकाज पार पाडतील याकरिता त्यांचेवर ग्राम सचिवांनी लक्ष व नियंत्रण ठेवण्याचे निर्देश सीईओ वाघमारे यांनी दिले.
i. यामध्ये गावातील अंगणवाडीवर व्यवस्थित लक्ष ठेवणे. त्यामध्ये जितकी मुले उपस्थित आहेत तितकीच हजेरीपटावर दाखवली जातात का हे तपासणे; अंगणवाडी वेळेवर उघडली जाते की नाही हे तपासणे; गरम ताजा आहार वेळापत्रकाप्रमाणे व्यवस्थित दिला जातो की नाही याबाबत खात्री करणे. अंगणवाडी मधील उपलब्ध साहित्याचा साठा व स्टॉक बुक यामधील नोंदी जुळतात की त्यामध्ये तफावत आहे याबाबत खात्री करणे. त्यासोबत अंगणवाडीमध्ये किमान 80% उपस्थिती आहे किंवा नाही याबाबत खात्री करणे.
ii. कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांवर लक्ष ठेवणे. यामध्ये क्षेत्रभेटीच्या दरम्यान शाळा वेळेवर उघडली जाते की नाही हे तपासणे. सर्व शिक्षक वेळेवर येतात की नाही हे तपासणे. मध्यान्ह भोजनाचा दर्जा चांगला आहे की नाही हे तपासणे, इत्यादी बाबींचा समावेश होतो.
iii. कार्यक्षेत्रांमधील आरोग्य उप केंद्र (सब सेंटर) व्यवस्थित काम करतात की नाही याबाबत खात्री करणे.
10) मंगळवार तसेच गुरुवारच्या दिवसभराच्या कामाचे नियोजन:
अ) मंगळवारी आणि गुरुवारी आपण दिवसभरामध्ये कोण कोणते कामकाज करणार आहात याबाबतचे नियोजन जिल्हास्तरावरच्या व्हाट्सअप ग्रुप वर सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांपूर्वी शेअर करणे.
ब) अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपणास वेळापत्रक पाळता येणार नाही आणि आपणास मुख्यालय सोडावे लागते अशा वेळी मुख्यालय सोडण्यापूर्वी किमान पाच मिनिटे आधी जिल्हास्तरावरच्या ग्रुप वर मेसेज करून पूर्व सूचना देणे, त्यानंतरच मुख्यालय किंवा कार्यालय सोडणे.
11) प्रत्येक वर्षामध्ये किमान तीन उल्लेखनीय कामे करणे:
a) यामध्ये जन्म किंवा मृत्यू होताच सात दिवसाचे आत संबंधितांची नोंद घेऊन प्रमाणपत्र देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे.
b) सर्व गरजवंतांचे नमुना आठ तात्काळ देणे जेणेकरून नमुना आठ बाबतची तक्रार पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद स्तरावर जाणार नाही हे उद्दिष्ट पूर्ण करणे.
c) यामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीची अस्वच्छता राहणार नाही याबाबतचे उद्दिष्ट पूर्ण करणे.
d) ग्रामपंचायत हागणदारी मुक्त अधिक (ODF Plus) करणे इत्यादी कोणतेही उद्दिष्ट आपण ठरवू शकता.
जर उद्दिष्टांचा शोध घेण्यामध्ये आपल्याला यश येत नसेल तर खालील तीन उद्दिष्टे उल्लेखनीय कामाकरिता आपण निवडू शकता.
१. आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा बोलक्या करणे.
२. आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्या बोलक्या करणे.
३. आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा अथवा अंगणवाडी याचे परिसरामध्ये 200 झाडे लावून त्याचे संगोपन करणे.
…तर मी अभेद्य भिंत बनुन तुमच्या मध्ये असेन: सीईओ
तुम्ही प्रामाणिकपणे आणि नियमानुसार काम करत असाल तर ग्रामसेवकांची सेवा विषयक प्रकरणे मार्गी लावण्यासाठी सीईओ म्हणुन मी कटीबध्द असल्याचे वाघमारे म्हणाले. प्रामाणिकपणे काम करतांना तुमच्यावर या जगातील कोणताही दबाव आला तर तुमच्या आणि त्या दबावाच्या मध्ये मी अभेद्य भिंत बनुन खंबीरपणे उभा राहिन असे आश्वासनही बैठकीच्या शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी ग्रामसेवकांना दिले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206