LATUR| लातूर जिल्ह्यातील अहमदपूर डेपोची बस नागपूरला जात असताना भीषण उष्णतेमुळे चालक आणि वाहकाची प्रकृती खालावल्याची धक्कादायक घटना उमरखेड येथे घडली आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

अहमदपूर डेपोची महामंडळाची बस क्रमांक एमएच २० बीएल १८६२ ही सकाळी १०:०० वाजता नागपूरसाठी निघाली होती. प्रवासादरम्यान इंजिनची उष्णता प्रचंड वाढल्याने चालक अमोल आनंदराव डोंगरे आणि वाहक हरिश्चंद्र नामदेव मुसळे यांची प्रकृती अचानक बिघडली. आपली प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच, चालक आणि वाहकाने तात्काळ बसमधील ४० ते ५० प्रवाशांना सुरक्षितपणे उमरखेड बस डेपोत उतरवले. त्यानंतर दोघांनीही स्वतः उमरखेडच्या सरकारी रुग्णालयात धाव घेऊन उपचार घेतले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर चालकाने पुढील प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला.
अहमदपूर ते नागपूर हे सुमारे ५०० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी कडक उन्हात संपूर्ण दिवस लागतो. अशा परिस्थितीत महामंडळाच्या जुन्या आणि भंगार झालेल्या बसेस लांबच्या प्रवासासाठी वापरणे म्हणजे कर्मचाऱ्यांचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे. महामंडळाच्या अत्याधुनिक बसेस आणि सुविधांचे सरकारचे दावे या घटनेमुळे पोकळ ठरले असून, जुन्या बसेस बदलून नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी आता जनतेतून जोर धरत आहे.


प्रतिनिधी, उमरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *