मूर्तिजापूर प्रतिनिधी –
Maharashtra Police यांच्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी ग्राम माना येथे सुरू असलेल्या दोन अवैध जुगार अड्ड्यांवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ मे २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत ग्राम माना येथील गणी प्लॉट परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी सय्यद ऐजाज सय्यद न्याहमत अली (रा. माना), प्रगोड आनंदराव सोळंके (रा. माना) व रविंद्र रामचंद्र सरदार (रा. हिवरा कोरडे) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून सट्टापट्टीच्या चिठ्ठ्या, डॉट पेन, कार्बन तुकडे तसेच १ हजार ९२० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी माना पोलीस ठाण्यात अप. क्र. २०८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत ग्राम माना येथील जुना प्लॉट परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या वेळी अशोक पांडुरंग विल्हेकर (रा. येवदा) व संतोष रमेश खडे (रा. रामतीर्थ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून सट्टापट्टी साहित्य व १ हजार १३० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी अप. क्र. २०९/२०२६ नोंद करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई मा. अप्पर पोलीस अधीक्षक बी. के. रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
