फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील जुन्या बायपासवरील हाॅटेल राधाकृष्णसमोर एका कृषी व्यापार्‍याचे २० लाख रुपये गाडीतुन लंपास केल्याची घटना घडली आहे. बँकेतून मोठी रक्कम काढून बाहेर पडणाऱ्या व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांना लुटणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. कारंजा शहरातील जुन्या बायपास रस्त्यावरील हॉटेल राधाकृष्ण समोर आज, १८ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एका कृषी व्यापाऱ्याच्या उभ्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २० लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीमुळे कारंजा आणि मानोरा येथील व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून, शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.चेतन अरुण हेडा (रा. मानोरा) असे फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव आहे. हेडा हे मानोरा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असून, त्यांचा स्वतःचा खाजगी कृषी बाजार आहे. व्यावसायिक व्यवहारासाठी त्यांनी कारंजा येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेतून २० लाख रुपये रोख काढले होते. ही रक्कम कारमध्ये ठेवून ते जुन्या बायपास रस्त्यावरून जात असताना, हॉटेल राधाकृष्ण समोर आंबे खरेदी करण्यासाठी काही वेळ थांबले.
हेडा कार उभी करून खाली उतरताच, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी अत्यंत शिताफीने कारची काच फोडली आणि आतील २० लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. हा संपूर्ण प्रकार काही मिनिटांतच घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.व्यापाऱ्याने बँकेतून एवढी मोठी रक्कम काढल्याची माहिती चोरट्यांना आधीपासूनच असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बँकेतून रक्कम घेऊन निघाल्यापासूनच चोरटे हेडा यांच्यावर पाळत ठेवून असावेत. व्यापारी गाडी सोडून बाजूला होताच चोरट्यांनी डाव साधला. यावरून ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे दिसून येते.घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.भरदिवसा आणि वर्दळीच्या बायपास रस्त्यावर झालेल्या या चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्य रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी करत, या टोळीचा तात्काळ पर्दाफाश करावा, अशी आक्रमक भूमिका व्यापारी संघटनेने घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *