उमरग्यातील चिंचोली (जहागीर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी वेदिका गोविंद बेंडगे हिची अमेरिकेतील नासा (NASA) अंतराळ संशोधन केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील गुणवंत २० विद्यार्थ्यांमध्ये तिने हे दिमाखदार यश मिळवले आहे.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटातून प्रत्येक तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांना या दौऱ्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये मुलींच्या निवड प्रक्रियेत वेदिकाने संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे चिंचोलीसह उमरगा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या कामगिरीबद्दल ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शिक्षणप्रेमींनी वेदिका व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, केंद्रप्रमुख एस. एन. मुदगडे आणि शाळा परिवाराने तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील या विद्यार्थिनीची गरुडझेप इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
प्रतिनिधी, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा.
