गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील खेळाडू विद्यार्थिनींनी विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. वर्धा येथे पार पडलेल्या स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले असून, संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत वर्धा येथील ओ.एस.जी. टेबल टेनिस अकादमीमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर विभागातील आठ जिल्ह्यांच्या संघांनी यात सहभाग घेतला. गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व लोकबिरादरी आश्रम शाळेच्या तीन संघांनी केले.
14 वर्षे मुलींच्या संघाने प्रथम नागपूर ग्रामीण संघाचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य सामन्यात गोंदिया जिल्ह्याच्या संघावर मात करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात नागपूर शहराच्या संघाला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.
विजयी संघात सलोनी वेलादी, रिद्धी तिम्मा, दीक्षा मडावी, परी पुंगाटी आणि संगिता लेखामी यांचा समावेश आहे. 14 वर्षे मुलांच्या आणि 17 वर्षे मुलांच्या संघानेही कांस्यपदक मिळवले.
या खेळाडूंचे पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक गिरीश कुलकर्णी, शरीफ शेख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रशिक्षक सुनिल आलामी आणि सर्व खेळाडूंचे कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
शंकर मुत्येलवार | एनटीव्ही न्यूज मराठी | भामरागड, गडचिरोली
