यंदाच्या पावसाळ्यात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार ३० सप्टेंबर २०२६ रोजी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यात आमदार रोहित पवार यांच्यासोबत पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा माजी आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस पंकज नाना बोराडे आणि प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातून दुपारी १ वाजता धुळे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर धावडे-अंजनविहीर येथे पाहणी केली जाणार आहे. दुपारी १:३० वाजता शेवाडे, २:१५ वाजता चिंचवार आणि २:४५ वाजता निमडाळे येथे भेट देण्याचे नियोजन आहे. त्यानंतर दुपारी ३:१५ वाजता धुळे जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्याकडे प्रस्थान केले जाणार आहे.
या दुष्काळ पाहणी दौऱ्याची माहिती धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी दिली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
