लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे २४ व्या वर्षातील अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. संत-महंतांच्या कीर्तनसेवेमुळे संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, सप्ताहासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

निलंगा तालुक्यातील मौजे कासार बालकुंदा येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित २४ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला सोमवार, दि. १६ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. परमपूज्य गुरुवर्य उज्वलानंद महाराज (अचलबेट देवस्थान) यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह.भ.प. मारुती महाराज लोहार यांच्या व्यासपीठ अधिष्ठानाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील मान्यवरांच्या पूजनाने सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

दि. १६ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या सप्ताहात ह.भ.प. भागवत महाराज पाचंगे गुरुजी, ह.भ.प. गुरुवर्य महेश महाराज माकणीकर, ह.भ.प. कृष्णानंद पुरी महाराज (मठ हाडोळी), ह.भ.प. दीपक महाराज (अमरबेट देवस्थान), ह.भ.प. सरोजा बक्के महाराज (कोळेवाडी), ह.भ.प. हरी गुरुजी लवटे महाराज (अचलबेट देवस्थान) आणि ह.भ.प. किशन महाराज जगताप (वलांडी) यांची कीर्तनसेवा होणार आहे.

रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. बन गुरुजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

सप्ताहाच्या कलशपूजनप्रसंगी ह.भ.प. भागवत महाराज पाचंगे, ह.भ.प. प्रताप कावले गुरुजी, ह.भ.प. मारुती महाराज, सप्ताहाचे अध्यक्ष सचिन कावले, उपाध्यक्ष नागनाथ सारगे, मसाजी महाराज, राम कावले आणि राम सारगे यांच्यासह गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

या सप्ताहामुळे कासार बालकुंदा गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सप्ताह यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *