स्व. आमदार गोवर्धन शर्मा यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आमदार नितीन देशमुख यांना कोणी दिला? – वैशालीताई शेळके
स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कामकाजावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा हास्यास्पद प्रकार आहे, असा घणाघाती आरोप भाजपा महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष तथा माजी उपमहापौर सौ. वैशालीताई शेळके यांनी केला.
वैशालीताई शेळके म्हणाल्या, “स्वतःला मोठे समजणारे, कर्तृत्व शून्य, केवळ गप्पांचा बाजार करणारे, जोरजोराने बोलणारे आणि दादागिरीची भाषा बोलणारे नितीन देशमुख यांनी अकोल्याचे ग्रामदैवत राजेश्वर मंदिरासाठी आमदार सादिक खान पठाण यांनी निधी आणला, असा अकोलेकरांना न पटणारा व हिंदुत्वाचा अपमान करणारा दावा केला आहे. मंदिरावर हल्ला करणारे, देशात शरियतची भाषा बोलणारे पठाण केवळ गप्पांचा दिखावा करू शकतात.”
“स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांनी अनेक विकासकामांसोबतच मानवतेचे कार्य आणि धर्म कार्य आपल्या तीस वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये केले. अकोल्याची रामनवमी असेल, शहरातील-जिल्ह्यातील कोणतेही धार्मिक कार्य असेल, त्यामध्ये अग्रेसर राहणारे, पूर असेल, आपल्या मतदारसंघातील कावडधारी असतील, त्यांना मदत करण्यात पुढाकार घेणारे नेतृत्व होते. शेतकऱ्यांविषयी आपुलकी असणारे ते नेते होते. आपण अप्रत्यक्षपणे त्यांचे नाव न घेता पंचवीस वर्षे भाजपाची अकोल्यात सत्ता असल्याचे सांगून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तो निंदनीय, निषेधार्ह आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे. आपल्याकडून अशा प्रकारची अपेक्षा कोणताही सभ्य माणूस करू शकत नाही. आपण आपली वृत्ती दाखवली आहे,” असाही आरोप वैशालीताई शेळके यांनी केला.
राजेश्वर मंदिराला दर्जा मिळवून देण्याचा खरा इतिहास :
राजेश्वर मंदिराला प्रथम ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रकृती खराब असताना सुद्धा आमदार गोवर्धन शर्मा, माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे यांनी विजय अग्रवाल आणि आमदार रणधीर सावरकर यांना सांगून तत्कालीन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आणि ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला.
‘ब’ वर्गासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेतला. राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजेश्वर मंदिराला भेट देऊन कोल्हापूर येथील कलाकारांना व आर्किटेक्टला बोलावून आराखडा तयार करून घेतला. त्यावेळी आमदार सादिक खान पठाण साधे नगरसेवक होते, आमदार नव्हते. त्यामुळे अकोलेकरांना व सनातन प्रेमी नागरिकांना, हिंदू नागरिकांना दूधखुळे समजवण्याचा प्रकार आमदार नितीन देशमुख यांनी करू नये.
तसेच सर्व कागदपत्रे दाखवण्यास आपण तयार असून, त्याचा पाठपुरावा आमदार रणधीर सावरकर यांनी 26 ठिकाणी मंत्रालयात फिरून त्याला दर्जा मिळवून दिला. ‘ब’ वर्गाच्या दर्जाला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आणि आराखड्याला निधीसाठी राज्य शासनाकडे आमदार सावरकर सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
परंतु खोटे श्रेय घेण्याची सवय असणाऱ्यांनी प्रत्येक कामात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा जनतेवरचा विश्वास पाहून काँग्रेस आणि उबाठा सेनेचा समतोल ढळू लागला आहे, त्यामुळे प्रत्येक बाबतीत महायुतीच्या कामाचे श्रेय घेण्याची स्पर्धा देशमुख आणि पठाण यांनी सुरू केली आहे. परंतु त्यांची वृत्ती, प्रवृत्ती सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे असा प्रकार त्यांनी करू नये.
आमदार गोवर्धन शर्मा हे अकोलेकरांचे, जिल्ह्यातील प्रत्येक सनातन प्रेमीचे गौरव, स्वाभिमान, विश्वास आणि भक्तीचे साधक असल्यामुळे त्यांच्यावर टीका-टिप्पणी करताना भान ठेवावे, असा सल्लाही सौ. वैशालीताई शेळके यांनी दिला.
भारतीय जनता पक्ष, अकोला
