सोलापूर : डॉक्टरकिचा उपयोग व्यवसायासाठी कमी आणि समाजसेवेसाठी अधिक करणारे सोलापूर जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर कै.डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अकलूजमध्ये जग प्रसिद्ध व्याख्याते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे स्थूलत्व व मधूमेह मुक्त भारत आभियान अंतर्गत व्याख्यान संपन्न झाले.

तत्पूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली.यावेळी डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील,डॉ.इनामदार,वसुंधरा देवडीकर,डॉ.श्रीकांत देवडीकर,डॉ.मानसी देवडीकर, डॉ.सतीश दोषी,डॉ.विवेक गुजर,डॉ.संतोष खडतडे, डॉ. सिद, डॉ.नितीन राणे, डॉ. श्रध्दा जवंजाळ,डॉ.वैष्णवी शेटे,आदी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. दीक्षित यांनी वजन कमी करणे, पोटाचा घेर कमी करणे,जास्त खाण्याचे दुष्परिणाम आदी विषयावर प्रकाश झोत टाकला. तर तीन वेळा खाणे हे अनैसर्गिक असल्याचे सांगितले.तर उपासाचे कर्क रोगातील महत्व,इन्सुलिनची रक्तातील पातळी वाढल्यास काय होते हे सांगितले. डॉ. जगन्नाथ दीक्षित व त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१३ पासून “स्थूलत्व व मधुमेह मुक्त विश्व” अभियान सुरु केले आहे. या अभियानात ४१ देशातील लाखो लोक सहभागी झालेले आहेत. संपूर्णपणे विनामूल्य असलेले हे अभियान देशात आणि परदेशातही अतिशय लोकप्रिय झाले आहे.या अभियानाची, जीवनशैलीची, त्यात मिळालेल्या यशाची आणि पुढील शक्यतांची माहिती समस्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी या उद्दिष्टाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.२०१८ मध्ये या अभियानाचे ध्येय गाठण्यासाठी असोसिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल अर्थात ‘अडोर’ या धर्मादाय संस्थेची स्थापना पुण्यात करण्यात आली. आज अडोर तर्फे देशात १३ शहरात मधुमेह मुक्ती केंद्रे आणि २१ ठिकाणी डॉ दीक्षित जीवनशैली विनामूल्य सल्ला केंद्रे चालवली जातात. या केंद्रांचा फायदा आजवर हजारो रुग्णांनी घेतला आहे.यावेळी डॉ. मानसी देवडीकर यांनी मनोगत व्यक्त केले तर डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी प्रास्ताविक केले.
प्रतिनिधी
मोहसिन शेख
एन.टी.व्ही.न्यूज मराठी माळशिरस (सोलापूर)
मो.७३८७५३१०७५