राज्यातील जुन्या वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या सर्व नवीन वाहनांसाठी एचएसआरपी पाटी बंधनकारक आहे.
तसेच १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठीही ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. यासाठी शासनाने पूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मात्र वाहनधारकांचा प्रतिसाद अपेक्षेइतका नसल्याने ती वाढवून ३० जून २०२५ करण्यात आली आहे. विहित मुदतीत एचएसआरपी नंबर प्लेट बसवले नाही, तर नियमभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असेही सगरे यांनी सांगितले.