
अहिल्यानगर : उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी टंचाईने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या तातडीच्या मागणीची दखल घेऊन सीना नदीतून शनिवारी सायंकाळी 5 वाजता पाणी सोडण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री विखे पाटील शुक्रवारी पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. टंचाई आढावा बैठकीसोबतच विविध गावांना भेटी देत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाणी सोडण्याची तातडीची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ ही मागणी मान्य केली.
सीना प्रकल्पातून उजव्या कालव्यातून आवर्तन 2 अंतर्गत सोडण्यात येणाऱ्या या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, हवामान खात्याने अल निनोचा धोका लक्षात घेऊन 31 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणीसाठा जपून ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही मंत्री विखे पाटील यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या निर्णयामुळे पारनेर आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार असल्याचा दिलासा मिळाला आहे.
