कर्जत तालुक्यातील काणगुडे वाडी परिसरातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टिपरला स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडले. कारवाईत 25 हजारांची वाळू आणि 5 लाखांची टिपर असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकाला अटक करण्यात आली.
अहिल्यानगर : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे कर्जत तालुक्यातील काणगुडे वाडी परिसरातून वाळूने भरलेला टिपर पकडण्यात आला.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरिष भोये, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर आणि प्रकाश मांडगे यांच्या पथकाने कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू केली होती. यावेळी गुप्त बातमीदाराकडून कर्जत-राशिन रोडने एक टिपरमध्ये अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच पथकाने काणगुडे वाडीच्या शिवारात विशाल हॉटेलसमोर सापळा रचला. काही वेळातच कर्जतकडून राशिनच्या दिशेने येणारा टिपर थांबवून चालकाची चौकशी केली. त्याने आपले नाव दत्ता दगडू काळे, वय 29 वर्षे, रा. रातनजण ता. कर्जत असल्याचे सांगितले.
तपासात टिपरमध्ये कोणतीही परवानगी नसताना 2.5 ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी 25 हजार रुपये किमतीची वाळू आणि 5 लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची टिपर असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनला गु.र.नं. 218/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.
पोलिसांचे आवाहन:
अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उपसा, वाहतूक किंवा इतर अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111 किंवा डायल 112 वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
