संगमनेर / अहिल्यानगर : संगमनेर परिसरातील बिअर बार आणि हॉटेल फोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय गँगला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईत 4 आरोपींना अटक करून 5 गुन्हे उघडकीस आणले असून, 5 लाख 55 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय घडलं?
3 मे 2026 रोजी घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खंदरमाळवाडी येथील फिर्यादी किशोर बाळाजी डोके यांच्या हॉटेल निलायम बारचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 6 हजार 190 रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता. याप्रकरणी घारगाव पोलीस स्टेशनला गु.र.नं. 142/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल होता.

अशी केली कारवाई
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत व चालक महादेव भांड यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी हसन हमजा कुट्टी रा. नवनाथनगर, शेवाडी, पंचवटी, नाशिक याने साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने नाशिकमधील म्हाडा बिल्डींग, वडाळा येथे धाड टाकून हसन हमजा कुट्टी, आकाश सचिन सूर्यवंशी रा. सिडको, नाशिक आणि मेहताब गुलाम रसुल अन्सारी रा. गिरटी, झारखंड यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदार बंटी दास रा. झारखंड याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. बंटी दास अद्याप फरार आहे.

चोरीचा माल विकला कुणाला?
आरोपींनी चोरीचा माल नाशिकमधील पळसे येथील हॉटेल लकी बार अँड रेस्टॉरंटचे चालक किरण रामदास उगले आणि विवेक अरुण उगले यांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी किरण उगले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 4 लाख 5 हजार 160 रुपये किमतीची विदेशी दारू, 1.50 लाखांची टाटा इंडिका कार एमएच 48 एफ 0723, कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल आणि स्क्रू ड्रायव्हर असा एकूण 5 लाख 55 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आणखी 5 गुन्हे उघड
सखोल चौकशीत आरोपींनी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील आणखी 5 गुन्ह्यांची कबुली दिली. यात संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे गु.र.नं. 101/2026, 115/2026, वावी पोलीस स्टेशन गु.र.नं. 108/2026 आणि पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन गु.र.नं. 78/2026 यांचा समावेश आहे.

सर्व आरोपींना घारगाव पोलीस स्टेशनला हजर करून अटक करण्यात आली असून पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहेत.

कारवाई करणारे अधिकारी : पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *