पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे घरात घुसून वृद्धाचा खून करून 12.70 लाखांची रोकड व दागिने लुटणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत जेरबंद केले. धक्कादायक बाब म्हणजे, हा खून व चोरी आरोपीने स्वतःच्या पुतण्याच्या घरी केली होती.
पारनेर/अहिल्यानगर : पैशाच्या लोभापायी पुतण्याने स्वतःच्या काकाचा हातोड्याने डोक्यात वार करून खून केला आणि घरातील रोकड व दागिने लुटून पळ काढला. पारनेर तालुक्यातील भांडगाव येथील या खून-जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांत लावत आरोपीला मुद्देमालासह अटक केली.
16 मे 2026 रोजी भांडगाव ता. पारनेर येथील भुजवळवस्तीवर राहणारे सिद्धेश संदीप खरमाळे यांच्या वडिलांचा खून करून घरातील 12 लाख 70 हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 367/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि हरिष भोये, संदीप मुरकुटे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, आकाश काळे, विशाल तनपुरे, रमीजराजा आत्तार, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, भगवान थोरात, चालक उमांकात गावडे, भगवान धुळे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून हा गुन्हा मयताचा पुतण्या महेश हनुमंत खरमाळे, वय 45 वर्षे, रा. भुजवळवस्ती, भांडगाव यानेच केल्याचे निष्पन्न झाले. तो भांडगाव-जामगाव रोडने लाल-काळ्या मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तळ्याजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत महेशने 15 मे रोजी पहाटे मयत संदीप भास्कर खरमाळे यांच्या घरी जाऊन हातोड्याने डोक्यात वार करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली. खुनानंतर घरातील रोकड चोरून नेल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून 10 लाख 29 हजार रुपये रोख रक्कम, 10 हजारांचा मोबाईल, 40 हजारांची मोटारसायकल, मयताचे आधारकार्ड आणि एक पांढरी दोरी असा एकूण 10 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीला पारनेर पोलीस स्टेशनला हजर करून अटक करण्यात आली असून पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहेत.
