• खासदार निलेश लंके यांचे सोशल मीडियाचे काम करणाऱ्या किशोर परभणे यांना झाली होती अमानुष मारहाण.
• सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून आरोपींनी केलं होतं अपहरण.
• चिंचोडी पाटीलचा सरपंच शरद खंडू पवारचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
• अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. शिंदे यांनी दिला महत्त्वाचा निर्णय.
AHILYANAGAR | खासदार निलेश लंके समर्थक आणि चिंचोडी पाटील गावचा सरपंच शरद खंडू पवार याला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सोशल मीडियाचे काम करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शरद पवारचा जामीन अर्ज अहिल्यानगर न्यायालयाने फेटाळला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरून किशोर महादेव परभणे यांचे अपहरण करून, त्यांना एका खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी किशोर परभणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रणव विजय मोरे, शरद खंडू पवार आणि मारुती देवराम कोकाटे यांच्यावर ४ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून हे अपहरण आणि मारहाण झाल्याचे समोर आले होते.
या घटने संदर्भात पोलिसांनी आरोपी शरद खंडू पवार यास अटक करून अहिल्यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. एस. आर. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला सुरुवातीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, पवार हा कोठडीत असताना तपास अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होता आणि कोणतीही समाधानकारक माहिती देत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या शरद खंडू पवार याने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या जामीन अर्जावर अहिल्यानगर येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी श्री. एस. आर. शिंदे (कोर्ट क्रमांक १७) यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. आनंद व्यवहारे यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षाच्या वतीने अॅड. धैर्यशील उर्फ अजित लक्ष्मण वाडेकर यांनी काम पाहत शरद पवार याच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कायदेशीर बाबी ऐकून घेतल्यानंतर आरोपी शरद खंडू पवार याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जामीन फेटाळल्यामुळे आता या संपूर्ण गुन्ह्यात शरद खंडू पवार याच्या सखोल चौकशीतून आणखी बरेच कारनामे आणि धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिनिधी, एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.
