शिर्डीतील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त 23 आणि 24 मे रोजी संरक्षण साहित्याचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. विद्यार्थी आणि नागरिकांना रॉकेट व क्षेपणास्त्र जवळून पाहण्याची संधी यावेळी मिळणार आहे.

शिर्डी: अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच सुरू होणाऱ्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त शिर्डीमध्ये दोन दिवसांचा भव्य संरक्षण प्रदर्शनाचा सोहळा रंगणार आहे. सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत 23 आणि 24 मे 2026 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते निबे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पात 155 मिमी क्षमतेचे तोफगोळे तयार होणार असून, वार्षिक 5 लाख तोफगोळे निर्मितीची क्षमता आहे. संपूर्ण तंत्रज्ञान आणि कच्चा माल स्वदेशी असून हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे.

प्रदर्शनात रॉकेट, क्षेपणास्त्र, रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. देशातील प्रमुख संरक्षण कंपन्या आणि 100 हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यात सहभागी होणार आहेत. त्यासाठी प्रकल्पस्थळी मोठे स्टॉल उभारण्यात आले आहेत.

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित केले जात आहेत. या प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विज्ञानप्रेमी, नागरिक आणि महिलांना संरक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याला रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस आणि मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. आता या उत्पादन प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *