अहिल्यानगरच्या केडगावमध्ये २०१८ मध्ये दोघा शिवसैनिकांचा खून झाला होता. त्यानंतर झालेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसैनिकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल आता लागला असून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
एप्रिल २०१८ मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.
हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यात सर्व आरोपींवर ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०८ लावले होते. मात्र, नंतरच्या तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली, त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य काहीसे कमी झाले होते.

या कारवाईनंतर आमदार अनिलभैय्या राठोड यांनी म्हटले होते केडगावमधील दगडफेक शिवसैनिकांनी केली नसून, मारेकऱ्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी आणि नातेवाईकांच्या आक्रोशातून ती झाली होती. शिवसेनेचा या दगडफेकीशी थेट संबंध नसताना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
पुढे २०२० मध्ये करोना साथीच्या लाटेत राठोड यांचे निधन झाले.. न्यायालयात खटला सुरु होता. त्याचा निकाल आता आला असून सर्वांची सुटका झाली आहे.
