अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावात छापा टाकून 3.137 किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी 79 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली असून बिहारमधील एका व्यक्तीकडून गांजा आणल्याची कबुली त्याने दिली आहे.

अहिल्यानगर: जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली LCB च्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावात छापा टाकून 78 हजार रुपये किमतीचा 3.137 किलो गांजा जप्त केला.

23 मे रोजी LCB चे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येळपणे येथील रहिवासी दादा साहदु दिघे हा आपल्या घरी गांजा विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे LCB पथकाने बेलवंडी पोलीस स्टेशनचे सपोनि नंदकुमार सोनवालकर, पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, कैलास सिपनकर यांच्या मदतीने येळपणे गावात छापा टाकला. झडतीदरम्यान दादा सहादु दिघे वय 79 वर्षे याच्या घरातून उग्र वास येणारा हिरवट रंगाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला.

पोलिसांच्या चौकशीत दिघे याने हा गांजा गौतम कुमार यादव रा. बडगाव शिंदोडी ता.जि. अहिल्यानगर, मुळ रा. देसपुर माझी, ता. सालिमपुरा, जि.पटना बिहार याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

या कारवाईत एकूण 78 हजार रुपये किमतीचा 3.137 किलो गांजा जप्त करण्यात आला. पोकॉ मनोज मोहन साखरे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस स्टेशनला गु.र.नं. 188/2026 प्रमाणे एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(ब) ii(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.

पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात कोठेही अंमली पदार्थांची खरेदी-विक्री सुरू असल्यास तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111 किंवा डायल 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *