किनगाव-जळगाव रस्त्यावर विनापरवाना जळाऊ पंचराज लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारे टाटा ७०९ वाहन यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केले आहे. कारवाईदरम्यान वाहन चालक घटनास्थळी वाहन सोडून फरार झाला.
गुप्त बातमीच्या आधारे गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४:३० वाजता कोळन्हावी चौफुली येथे वन विभागाच्या गस्ती पथकाने संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली होती. यावेळी टाटा ७०९ वाहन क्रमांक MH-18-D-7454 येताना दिसले. वन कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन घटनास्थळी सोडून लगतच्या केळीच्या बागेत पळ काढला. शोध घेऊनही तो सापडला नाही. पंचांच्या समक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात सुमारे १३.०० घनमीटर बेकायदेशीर जळाऊ पंचराज लाकूड आढळून आले. लाकूड वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे उपलब्ध नव्हती. वन विभागाने लाकडासह वाहन जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा केले आहे. याप्रकरणी वन गुन्हा क्रमांक २१/२०२६, दिनांक १७/०९/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास वागझिराचे वनपाल करत आहेत. उप वनसंरक्षक सौरिष सहाय, विभागीय वनाधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर आणि सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील, वनपाल संजय पाटील, वनरक्षक सतीश वाघमारे व आय. बी. चव्हाण यांनी ही कारवाई केली.
