यावल येथे भारतीय स्टेट बँक शाखेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. साकळी केंद्रातील थोरगव्हाण आणि मनवेल येथील दोन आदर्श शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
साकळी केंद्रातील थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक निलेश धर्मराज पाटील तसेच मनवेल येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक दीपक चव्हाण यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी घेतलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच शाळा आणि समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत भारतीय स्टेट बँकेच्या वतीने दोन्ही शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यावल येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय स्टेट बँकेचे वरिष्ठ अधिकारी धर्मेंद्र प्रधान व मुलमुले, तसेच गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षण अधिकारी फिरोज पठाण, भुसावळ प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक श्रीकांत मेठे यांच्यासह मित्रपरिवाराची प्रमुख उपस्थिती होती.
या गौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. गुणवंत शिक्षकांच्या या सन्मानामुळे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळाले.
