उमरगा येथे आकांक्षा अर्बन निधी लि.ची स्थापना..!
उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व त्यांच्या सहकार्यांनी मिळून उमरगा येथे आकांक्षा अर्बन निधी ली. या सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा देणाऱ्या संस्थेची स्थापना केली असून बुधवार दिनांक ५ जानेवारी रोजी शहरातील ‘बडवे कॉम्पलेक्स’ येथे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आ.ज्ञानराज चौगुले म्हणाले की, छोट्या व्यावसायिकांना आणि गरजूंना आधार देता यावा या उद्देशाने कर्ज नव्हे तर परतफेडीच्या हमीवर मदत करण्याच्या उद्देशाने हि संस्था सुरु केली असून, या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक व्यवसाय करणारे व्यापारी इतर छोटे व्यावसायिक, तसेच महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी कमी कागदपत्रात व तात्काळ कर्ज पुरवठा देण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतकरी वर्गाला पेरणी, खुरपणी, औषध फवारणी, मजुरी देण्यासाठी अनेकदा छोट्या छोट्या रकमांची गरज असते परंतु अशा शेतकऱ्यांना कोणतीही बँक वेळेवर कर्ज उपलब्ध करून देत नाहीत, अशा शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ना नफा ना तोटा तत्वावर हि संस्था चालविणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आकांक्षा अर्बन निधी ली. येथे सोने तारण कर्ज, पिग्मी लोन, मालमत्ता तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, अल्प बचत कर्ज, महिला बचत गत कर्ज, पगार तारण कर्ज, पिक कर्ज, व्यवसाय वृद्धी कर्ज, मुदत ठेव कर्ज, वाहन कर्ज, आदी कर्ज सुविधा उपलब्ध असून ठेवीवर आकर्षक व्याजदर देण्यात येणार आहे, “कर्ज नव्हे तर परतफेडीच्या हमीवर व्यवसायासाठी मदत” या तत्वावर ही संस्था सुरू केली असून तालुक्यातील जास्तीत-जास्त शेतकरी, व्यापारी यांनी याठिकाणी आपले खाते उघडण्याचे आवाहन चेअरमन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.उदय मोरे तर युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आकांक्षा अर्बन निधीचे व्हाईस चेअरमन मोह्ययोद्दिन सुलतान, संचालक विजय वडदरे, बळीराम सुरवसे, गिरीश सूर्यवंशी, डॉ.अनंत मुगळे, सत्यम चौगुले, डॉ.ज्ञानेश्वर साबणे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, महावीर (अण्णा) कोराळे, धोंडीराम चौगुले, राजेंद्र माळी, सतीश जाधव, बलभीम येवते, अमर देशटवर, शरद इंगळे, उमरगा अर्बन निधीचे व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी, प्रदीप मदने, शेषेराव वदडरे, सुरेश सावळकर, शरद पवार, दिलीप भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
सचिन बिद्री:उमरगा उस्मानाबाद