मलकापूर शहराजवळील घटना
बुलडाणा लाकडाची अवैध वाहतूक करणारे मिनी ट्रक हे मलकापूर वरून एमआयडीसी कडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकचे समोर एक चाक निघून समोरून येणाऱ्या अर्टिगा गाडीवर आदळल्याने अपघात घडला या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी अर्टिगा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मलकापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

नागपूर-मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मलकापूर जवळील धरणगाव फाट्याजवळ सोमवारी रात्री उशिरा लाकडाने भरलेला मिनी ट्रक हा भरधाव वेगाने एमआयडीसी कडे जात असतांना वाहनाचे समोरील एक चाक निखळून पडले. दरम्यान सदर चाक हे समोरून येणाऱ्या अर्टिगा गाडीवर आदळल्याने अपघात घडला या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी अर्टिगा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अर्टिगा गाडीवर ‘महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग अत्यावश्यक सेवा” सईबाई मोटे सामान्य रुग्नालय शेगाव” असे स्टिकर चिटकवाले असल्याचे दिसून आले. याबाबत शेगाव येथील रुग्णालयात चौकशी केली असता असे कुठलेही वाहन आपल्याकडे कार्यरत नाही असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाई पासून बचावासाठी अनेक आरोग्य विभागातील कर्मचारी असे खोटे स्टिकर बनवून चिटकवित असल्याचे दिसून येत आहे. या अपघाताप्रकरणी मलकापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
