राज्यस्तरीय प्रदर्शनी व विक्री केंद्राचे उद्घाटन….
गोंदिया : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू गुणवत्तापुर्ण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. कोणताही उद्योग व्यवसाय म्हटले की, गुणवत्ता, वेळेत पुरवठा व मार्केटिंग आवश्यक असते. त्यामुळे बचतगटांनी वस्तूंच्या गुणवत्तेसोबतच मार्केटिंगवर भर दयावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व उत्कर्ष फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची राज्यस्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डच्या महाप्रबंधक रश्मी दराड होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, नाबार्डच्या सहाय्यक महाप्रबंधक उषा महेश, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाप्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, बँक ऑफ इंडियाचे डेप्यूटी जनरल मॅनेजर रतनकुमार चॅटर्जी, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर संतोष एस., स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर सत्यस्वरुप मेश्राम, जिल्हा प्रशासन अधिकारी करणकुमार चव्हाण, डीआरडीएचे प्रकल्प अधिकारी दिनेश हरिणखेडे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्रकुमार रहांगडाले व माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय संगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बचतगटांनी मोठी ध्येय ठेवावी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाल्या, ग्रामीण कलेला चालना देण्याकरीता गोंडी पेंटींग, बांबूपासून तयार केलेले साहित्य, लाकडापासून निर्मित विविध कलाकृती यांचे योग्य नियोजन केले तर मार्केटिंग उपलब्ध होऊ शकते. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील म्हणाले, बचतगटाचे उत्पादन फार चांगले असतात. परंतू बचतगटांनी उत्तम पॅकेजिंग व मार्केटिंगकडे लक्ष केंद्रीत करावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना रश्मी दराड म्हणाल्या, महिलांनी बचतगटामार्फत उद्योजक बनून आर्थिक विकास करावा. तसेच कर्ज पुरवठा बाबत बँकेशी सतत पाठपुरावा करीत राहावे.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाप्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव व बँक ऑफ इंडियाचे डेप्यूटी जनरल मॅनेजर रतनकुमार चॅटर्जी यांनी बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती विशद केली. या प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंचे एकूण 50 स्टॉल्स लावलेले आहेत. ही प्रदर्शनी 8 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे, त्यामुळे सदर प्रदर्शनीला जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन वस्तूंची विक्री करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.प्रास्ताविक नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक नीरज जागरे यांनी केले. संचालन पल्लवी भुजाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उत्कर्ष फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीना भागवतकर यांनी मानले.