लातूर : भर उन्हाळ्यात ओसाड माळरानावर भटकंती करायला बहुतेक कोणाला आवडणार नाही, परंतु निसर्गातील अद्भुत सौंदर्य पाहण्याची आवड असेल अन जैवविविधतेतील सुंदर घटकांची माहिती आपल्याला असेल तर ओसाड उजाड माळरानं सुद्धा आपल्याला सुंदर वाटायला लागतात. त्यामुळे आजची भटकंती आपण लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात असणाऱ्या माळरानावर करणार आहोत जी माळरानं आपल्या दृष्टीक्षेपात किर्रर्र उन्हात सुद्धा पाहायला नकोशी वाटतात पण तिथे अधिवास असणाऱ्या सुंदर अशा सरपटणाऱ्या रंगीत गळ्याचा पंखेवाल्या सरड्याला पाहून ही ओसाड माळरान सुद्धा सुंदर वाटायला लागतील.

आपण आपल्या आजूबाजूला सरडा नेहमीच पाहतो पण हा सरडा जरा वेगळा आहे, याचे नाव मराठी भाषेत अधिकृत नसले तरी याचे बारसे आपणच घातले आहे त्यामुळे याला आपण याच्या वर्णनावरून “डेक्कनचा रंगीत गळ्याचा पंखेवाला सरडा” असे म्हणू शकतो. यालाच इंग्रजीत Deccan Fan Throated Lizard असे म्हणतात तर वैज्ञानिक भाषेत Sarada deccanensis या नावाने ओळखले जाते. हा सरडा दिसायला अत्यंत देखणा असून त्याला गळ्यापासून पोटाला मागच्या पायापर्यंत वरच्या बाजूला स्काय ब्लु, मध्यभागी काळा आणि खालच्या बाजूस केसरी रंगाचा पंखा असतो हे एक त्याचे प्रमुख आकर्षण आहे. एरव्ही याचा हा रंगीत पंखा तो दाखवत नाही पोटाला चिकटून असतो. मादीला आकर्षित करण्यासाठी किंवा दुसऱ्या नराला चेतावणी देण्यासाठी तो आपला पंखा बाहेर काढून फडफडत असतो. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळताना कांगारू प्राण्यासारखा समोरचे दोन पाय वर करून पळत सुटतो त्यामुळे त्याची पळताना चाल पटकन लक्षात येते, या सारड्याचा मिलनाचा कालावधी हा प्रामुख्याने एप्रिल मे दरम्यान असल्याने व याच काळात या प्रजातीच्या नर सरड्यांना रंगीत पंखा दिसतो व बाकी वेळेस मळकट पांढरा रंग पोटाला दिसतो फक्त मिलन काळातच या नर सरड्यांना रंगीत पंखा दिसतो तर मादी सरडा मळकट पांढऱ्या रंग समोरच्या पोटाला असलेली दिसते व नराप्रमाणे मादी पंखा काढत नाही. त्यामुळे हा फरक दिसून येतो. तसेच माळरानावर असलेल्या दगड गोट्यांवर, ढिगाऱ्यावर, गावालगत असलेल्या पडीत जमिनीवर , उंच भागावर हे सरडे उंचावर येऊन मादीचा शोध घेत असतात व तिला आकर्षित करण्यासाठी आपला सुंदर असलेला रंगीत पंखा बाहेर काढून तिला मिलनासाठी आकर्षित करताना दिसून येतात. निसर्गातील अन्नसाखळीचा हा सरडा एक अविभाज्य घटक आहेत त्यामुळे याचे महत्व जैवविविधतेमध्ये आहे. यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी अधिवास जपणे फार गरजेचे आहे. निसर्गातील सुंदर अशा घटकांचा आनंद पाहायला जरूर जा पण त्यांना नुकसान होऊ नये याची खबरदारी मात्र घेऊनच. नाहीतर आपल्या मजेपायी त्यांचा जीव जाणार नाही एवढे लक्षात ठेवुयात, धन्यवाद. छायाचित्रे आणि लेखन: धनंजय गुट्टे, वन्यजीवप्रेमी तथा सदस्य लातूर जिल्हा जैवविविधता समिती मो. 9765000141

प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *