सचिन बिद्री,उमरगा:

भारत शिक्षण संस्थेच्या उमरगा येथील श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब सिद्राम मुसांडे वय ८७ वर्ष यांचे बुधवारी (ता.आठ) सांयकाळी सव्वापाचच्या सुमारास उमरगा येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे व पणतु असा परिवार आहे. नानासाहेब मुसांडे मुळ माकणी (ता.लोहारा) येथील रहिवाशी. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या उमरग्यातील भारत शिक्षण संस्थेच्या भारत विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात एम.ए. (ऑनर्स) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या मिलींद महाविद्यालयात त्यांनी दोन वर्ष गणित विषयाचे प्राध्यापक म्हणुन काम केले. त्यानंतर जुन १९६६ ते जुन १९९६ या प्रदिर्घ काळ श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे यशस्वी प्राचार्य, कुशल प्रशासक म्हणुन काम केले. गणित विषयाच्या अध्यापनात त्यांचा हातखंडा होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विधार्थी उच्च पदावर गेले. जवळपास ३१ वर्ष मराठवाड्यातील पहिले आणि जेष्ठ प्राचार्य होते. या दरम्यान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यकारणी सदस्य म्हणून पाच वर्ष काम पाहिले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (औरंगाबाद) सदस्य म्हणुन त्यांनी काम केले. १९९६ साली स्थापनेच्या कालावधीपासुन भाऊसाहेब बिराजदार अर्बन को – ऑपरेटिव्ह बॅंकेचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. भारत शिक्षण संस्थेचे सचिव, सरचिटणीस म्हणुन जवळपास दहा वर्ष काम केले. संस्थेतील विविध विद्या शाखेच्या विस्तारात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. (कै.) मुसांडे यांच्या पार्थिवावर गुरूवारी (ता.नऊ) सकाळी दहा वाजता उमरगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *