सचिन बिद्री:उमरगा
शांतिदूत परिवाराच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा चौरस्ता येथील ओम लॉन्स येथे तालुक्यातील विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 प्रयोगशिल व सेंद्रिय शेती विकसित करणाऱ्या बळीराजांचा रविवारी मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, शांतीदुत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई जाधव,राज्याचे कृषी सह संचालक डॉ. तुकाराम मोटे,शेतकरी शांतीदूत परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय ठूबे,विजय बोत्रे,विकास देशमुख,तहसिलदार बालाजी शेवाळे (पुणे),माजी अतिरीक्त पोलीस अधिक्षक अशोक क्षीरसागर,उमरगा पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, दिपक जवळगे, जैन इरिगेशनचे संजय मुटकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या भव्य शेतकरी मेळाव्यात 75 शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करत प्रोत्साहित करण्यात आले.दरम्यान या मेळाव्यात शेतीसाठी लागणारे सेंद्रीय बी-बियाणे,अवजारे व महीला गटामार्फत उत्पादित वस्तुंचे स्टॉल विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

बळीराजाच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, प्रत्येक स्तरातून त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे, त्यांच्या कार्याचा कौतुक व्हायला पाहिजे असे मत शांतिदूत परिवाराचे संस्थापक तथा माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी मेळाव्यात प्रास्ताविक मांडताना शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले.याच कार्यक्रमात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
तर दुपारच्या सत्रात बळीराजा कवी संमेलनाचे आयोजन करून बळीराजाच्या सुखदुःखाच्या भावना काव्यसंमेलनाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.यावेळी रसिकांनी या कवी संमेलनाला भरभरून प्रतिसाद दिला.मेळाव्यात ठेवण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील शेतीउपयोगी उपकरण शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.यासाठी प्रा. जिवन जाधव भूमिपुत्र वाघ, प्रसाद पवार, प्रा. युसुफ मुल्ला, बाबा जाफरी, हरीश सर, किशोर औरादे, प्रा. प्रसाद पवार आदिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.