अहमदनगर : अनेक लोकोपयोगी निर्णयातून सर्वसामान्यांना विकास साधण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. विविध कल्याणकारी योजना गतीने व प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.

”स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव अधिक द्विगुणीत होण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावर्षीही ‘हरघर तिरंगा’ अभियान राबविण्याचे देशवासियांना आवाहन केले होते. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशाप्रती व्यक्त केलेला अभिमान बलशाली भारताच्या एकजुटीचे प्रतीक ठरले आहे. या उपक्रमाने प्रत्येक शहर, गाव, वाडी-वस्ती तिरंगामय झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. स्वातंत्र्यानंतर या देशाच्या प्रगतीची वाटचाल अनेक टप्पे पुर्ण करुन यशस्वी होताना दिसत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचे नाव पूर्ण विश्वामध्ये घेतले जात असल्याचेही ते म्हणाले. जनहिताचे अनेक निर्णय घेत शासनाची वाटचाल सुरु असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, ”१ ते १५ ऑगस्ट दरम्यान महसुल विभगामार्फत महसूल पंधरवडा राबविण्यात आला. या माध्यमातुन शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. या काळात जिल्ह्यात एकूण ३३ हजार ३५३ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीमध्ये सहभाग नोंदविला. शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्त्याचे प्रश्न सोडवुन रस्ते समन्वयाने खुले करण्यात आले. युवासंवाद कार्यक्रमातून ८ हजार ८३० दाखल्याचे युवकांना वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सैनिकांना २६० दाखल्यांचे वाटप करत नवनियुक्त १८९ तलाठ्यांना नियुक्ती पत्राचेही वितरण करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
