पालघर : विधानसभा क्षेत्रांतील मत्स्यव्यवसाय विभागाची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा असे निर्देश आज पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी अधिकारी वर्गाला दिले.
पालघर येथील शासकीय विश्रामगृहात मत्स्य व्यवसाय व बंदर विभागातील प्रलंबित, प्रस्तावित विकासकामांच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दातीवरे-एडवण केळवे ते धाकटी डहाणूकिनाऱ्यावरील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. नियोजीत बंदरे विकास,धुपप्रतिबंधक बंधारे,किनाऱ्यावरील मासळी सुकविण्यासाठी ओटे, शौचालय, जाळी विणण्याचे शेड,उतार पायऱ्या आदी विकासकामांवर चर्चा करण्यात आली.यावेळी कामाचा दर्जा चांगला असावा असे ही आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी अधिकारी वर्गाला सांगितले.

दरम्यान जिल्हा नियोजन विकास निधी व मंत्रालय स्तरांवर अधिकचा निधी मिळणे कामे आपण योग्य तो पाठपुरावा करू असेही सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.राजेशभाई शाह,शिवसेना महिला जिल्हाप्रमुख श्रीमती ज्योतीताई मेहेर,जि. प.सदस्या श्रीमती सीमा गवते यांसह सहआयुक्त,मत्स्यव्यवसाय पालघर-ठाणे श्री.पालव, कनिष्ठ अभियंता पतन विभाग श्री.सावंत यांसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.