श्रीगोंदा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील पिसोरे बुद्रुक येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून 8 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 32 लाख 57 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अहिल्यानगर: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. 16 मे 2026 रोजी रात्री उशिरा मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस पथकाने बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील पिसोरे बुद्रुक येथील अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

रात्री 10:30 ते 17 मे रोजी पहाटे 2:30 वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून 8 इसमांना रंगेहाथ पकडले. तर 2 इसम एका मोटारसायकलसह पळून गेले.

या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम 76,800 रुपये, 2 चारचाकी आणि 6 दुचाकी मिळून 26 लाख रुपये किमतीची वाहने, 10 मोबाईल फोन 5 लाख 11 हजार रुपये किमतीचे आणि 1 लॅपटॉप 70 हजार रुपये किमतीचा असा एकूण 32 लाख 57 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पकडलेल्या आरोपींसह हा सर्व मुद्देमाल बेलवंडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून, तेथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

छापा पथकात श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोहेकॉ संभाजी वाबळे, पोकॉ महादेव कोहक, पोकॉ शरद गावडे, पोकॉ रविंद्र जाधव आणि पोकॉ सचिन वारे यांचा समावेश होता. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *