अहिल्यानगर : पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार श्रीगोंदा तालुक्यात अवैध गुटखा आणि पानमसाला विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. बेलवंडी पोलीस पथकाने लोणी व्यंकनाथ आणि आढळगाव येथे एकाचवेळी 4 ठिकाणी छापे टाकून 4 लाख 40 हजार 296 रुपयांचा गुटखा-पानमसाला आणि 22 लाख रुपयांच्या वाहनांसह एकूण 26 लाख 40 हजार 296 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना गुप्त माहिती मिळाली होती की, श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी व्यंकनाथ आणि आढळगाव परिसरात अवैध गुटखा व सुगंधी पानमसाल्याची विक्री सुरू आहे. माहितीची खात्री करून त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने लोणी व्यंकनाथ येथे छापा टाकला. यावेळी प्रवीण सतीश गायकवाड यांच्या किराणा दुकान, गोडाऊन आणि क्रेटा गाडीमध्ये अवैध गुटखा व पानमसाला विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळले. तसेच शरद सिताराम वडवकर यांच्या किराणा दुकानातही गुटखा विक्री सुरू असल्याचे उघड झाले.
या दुकानदारांना गुटखा पोहोचवणाऱ्या मारुती सुझुकी कॅरी मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता त्यातही मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखू आढळून आला. गाडीचा चालक नागेश नीलकंठ सुमकवर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हा माल रवी बबन दळवी रा. रोकडोबा चौक, श्रीगोंदा यांच्या सांगण्यावरून आणल्याचे सांगितले.
नागेशने दिलेल्या माहितीवरून पथकाने आढळगाव शिवारातील अक्षय राजू होले याच्या ठिकाणीही छापा टाकला. तेथूनही गुटखा जप्त करण्यात आला.
या चारही ठिकाणच्या कारवाईत 4 लाख 40 हजार 296 रुपयांचा गुटखा व पानमसाला, 22 लाख रुपये किमतीची क्रेटा, टोयोटा ग्लांजा आणि मारुती सुझुकी कॅरी गाडी असा एकूण 26 लाख 40 हजार 296 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईत शरद सिताराम वडवकर रा. लोणी व्यंकनाथ आणि नागेश नीलकंठ सुमकवर रा. श्रीगोंदा यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडे सोपवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोहेकॉ भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, पोना शरद गांगर्डे, पोकॉ कैलास शीपनकर, राजू भोर आणि दादासाहेब शिरसागर यांनी केली.
