अहमदनगर : स्वात्यंत्र दिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महाराजांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नगर शहरातील मुस्लिम समाजातर्फे मोर्चा काढून डीएसपी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या मोर्चात मुस्लिम समाजबांधवांसह युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

कोठला येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झाला. यामध्ये युवकांनी हातात काळे झेंडे घेऊन मोर्चात सहभाग नोंदवला. नगर-संभाजीनगर मार्गे मोर्चा डीएसपी चौकात आला असता, युवकांनी ठिय्या देत चक्का जाम आंदोलन केले. संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करुन आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. 

राज्यातील मुस्लिम समाजबांधव सर्व धर्माचा आदर व सन्मान करत आला आहे. मात्र, काही महाराज व राजकीय नेते मंडळी वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम द्वेष वाढवत आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरु लागले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याला प्रशासन जबाबदार आहे. रामगिरी महाराज आपल्या प्रवचनातून समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. हा प्रकार निंदनीय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मागणीचे निवेदन पाेलीस प्रशासनाला देण्यात आले.