पालघर : पालघर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने नुकताच सफाळे ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक माहितीचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार पालघर तालुका मध्ये कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचे निर्देश आहेत, त्यानुसार दिनांक २ आक्टो.२०२१ ते १४ नोव्हें.२०२१ या कालावधीत पालघर तालुक्यातील गावागावात तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने विविध पंथनाट्य,शिबिरे,व्याखाने आयोजित केली जाणार आहेत.त्याचाच एक भाग म्हणून पालघर तालुक्यातील सफाळे या ग्रामपंचायत येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा साठी विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मा.श्री. ए.ए.चेंडके उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात श्री.चेंडके यांनी महिलांच्या विषयक विविध कायदे व त्यातील तरतुदी याविषयी माहिती दिली. यावेळी जेष्ठ विधीज्ञ श्री.दीपक भाते,सफाळे पोलीस स्टेशन सहा.पोलीस निरीक्षक श्री.संदीप कहाले,सरपंच श्री.आमोद जाधव उपसरपंच श्री.म्हात्रे, पालघर विधी सेवा समितीचे विधिज्ञा श्रीमती .सावे, श्रीमती. श्रुती पारायणे,श्री. व्ही. टी. पाटील,सह सफळ्यातील वकील मंडळी अड.नवीन घरत,अड.विनय पाटील, न्यायालय कर्मचारी श्री. बेडसे,दांडेकर विधी महाविद्यालयाचे विधी स्वयंसेवक श्री. निलेश राऊत,श्री.दिनेश पाटील,श्री.उचित पाटील,श्री. तुषार चौधरी जेष्ठ नागरिक,ग्रामस्थ,महिला उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.किणी यांनी केले.