प्रतिनिधी, अनिल बालपांडे, नागपूर.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे विभागीय नाट्य संमेलन दिनांक 24 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते, प्रशांत दामले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

या संमेलनात व्यावसायिक नाटक लोककलेवरील कार्यक्रम स्थानिक शाखेचे व कलावंताचे सादरीकरण तसेच बाल कलावंतांची विशेष प्रस्तुती असणार आहे.

डॉ. गिरीश गांधी यांच्या गौरवार्थ 24 एप्रिल 2025 रोजी रात्र कालीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन “हास्य जत्रा” या मालिकेचे सुप्रसिद्ध कलावंत, हेमंत पाटील हे करणार आहेत. 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजता “चला हवा येऊ द्या” या मालिकेतील सुप्रसिद्ध कलावंत, भारत गणेशपुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. तदनंतर सकाळी 9 वाजता “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते, देवेंद्र दोडके यांच्या हस्ते नाट्य संमेलन निर्मित उभारण्यात येणाऱ्या रंग मंचाचे पूजन होणार आहे.

26 एप्रिल ला सकाळी 7 वाजता गांधीगेट, महाल, नागपूर येथील शिवाजी पुतळ्यापासून नाट्य दिंडीला सुरुवात होईल. यात सुमारे 900 कलावंत महाराष्ट्रातील लोककला सादर करतील. प्रशांत दामले, भाऊ कदम, अजित भुरे, डॉ. जब्बार पटेल, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, शलाका पवार, विजय गोखले, विजय केंकरे ,चंद्रकांत कुलकर्णी आणि मोहन जोशी यासारख्या नामवंत कलावंतांचा सहभाग राहील.

26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होत असलेल्या उद्घाटन सोहळ्याला नागपूर शहराचे पालकमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री, उदय सामंत, राज्यमंत्री, आशिष जयस्वाल तसेच स्थानिक आमदार, संमेलन अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष, प्रशांत दामले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच दुपारी 12 वाजता भाऊ कदम यांचे “सिरीयल किलर” हे व्यावसायिक नाटक सादर होत असून दुपारी 3 वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगर एक या शाखेचे विदर्भाचा इतिहास सांगणारे “सारस्वतीजन्मभू: “हे नाटक सादर होत असून दुपारी 5 वाजता “आजचे नाटक” या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादाला अभिनेते, विजय गोखले, विजय केंकरे ,अजित भुरे, चंद्रकांत कुलकर्णी, पराग घोंगे अशी मातब्बर मंडळी सहभागी होतील. सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला “महाराष्ट्राची लोकधारा” हा मराठमोळा कार्यक्रम सुद्धा सादर होईल. याच रात्री 9 वाजता महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या पूर्व वैधर्भीय जिल्ह्यात झाडीपट्टी रंगभूमीची सांस्कृतिक परंपरा सांगणारा आणि लोककलेला जिवंत ठेवणाऱ्या झाडीपट्टीच्या रंगभूमीची स्वतंत्र ओळख करून देण्याच्या दृष्टीने “शतकोत्तर झाडीपट्टी,” या कार्यक्रमाचे सादरीकरण 150 कलावंताद्वारे होत असून झाडीपट्टीतील 15 समूह यात सहभागी होणार आहेत .

27 एप्रिल 2025 रोजी सकाळी नऊ वाजता बालरंग भूमी परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकलाकारांचे आणि दिव्यांग मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असून दुपारी 12 वाजता नागपूर शाखेतर्फे संपन्न झालेल्या 100 नाट्य संमेलनावर प्रकाश टाकणारा “शतकीय संमेलनाची वारी” ही नाट्यधारा सादर होत आहे. सायंकाळी 5 वाजता दंडार, तमाशा आणि खडी गंमत यासारखे लोककलेचे कार्यक्रम सुद्धा सादर होणार आहेत. सायंकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्री, भारत सरकार, नितीन गडकरी यांच्या अध्यक्षते खाली या संमेलनाचा समारोप सोहळा संपन्न होत असून लगेचच 7 वाजता “हीच खरी फॅमिलीची गंमत” हे अतिशय गाजलेले मुंबईचे व्यावसायिक नाटक सादर होणार आहे. तदनंतर रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या कलावंताचा सत्कार व सन्मान करण्यात येईल.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले केंद्रीय उपाध्यक्ष नरेश गडेकर नागपूर शाखा अध्यक्ष अजय पाटील नागपूर उपनगर अध्यक्ष सलील शेख तसेच मुंबई कार्यकारणी सदस्य संजय रहाटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *