वाशिम : बाल कामगार व किशोरवयीन कामगार कायद्याअंतर्गत कार्यरत असलेल्या कृती दलाने आज 10 डिसेंबर रोजी मालेगांव येथील दोन आस्थापनेवर धाड टाकून दोन बाल कामगारांची मुक्तता केली. बाल कामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी आज 10 डिसेंबर रोजी मालेगांव येथे धाडसत्राचे आयोजन करण्यात आले होते. तपासणी दरम्यान संतोष फेब्रीकेशन ॲन्ड भावना ॲग्रोवर्क आणि अग्नीहोत्री मोटर्स, शेलु रोड मालेगांव या दोन आस्थापनेत प्रत्येकी एक असे एकूण दोन बाल कामगार काम करीत असल्याचे कृती दलाला आढळून आले. कृती दलाने सदर बाल कामगारास मुक्त करुन संबंधित आस्थापनाधारक रमेश सुरडकर आणि संदीप अग्नीहोत्री यांचे विरुध्द पोलीस स्टेशन मालेगांव येथे गुन्हा दाखल केला.

बाल कामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 सुधारणा 2016 अंतर्गत कोणत्याही आस्थापनेत बाल कामगार असल्यास त्याबाबत कोणताही नागरीक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी तक्रार नोंदवू शकतो. या कायद्याचे उल्लंघन केल्यास काम करुन घेणाऱ्या विरुध्द कलम 14 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येते. तरी बाल कामगार या अनिष्ट प्रथेचे समुह उच्चाटन करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे व कोणीही बाल कामगार कामावर ठेवू नये. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे.

धाड सत्राच्या यशस्वीतेसाठी सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांच्या मार्गदर्शनात दुकाने निरीक्षक विनोद जोशी, योगेश गोटे, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, चाईल्ड लाईनचे समन्वयक अविनाश चौधरी, पोलीस कॉन्सटेबल प्रेमदास आडे व श्रीमती सुषमा लोखंडे यांनी या कारवाईसाठी सहकार्य केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *